भाजपाने वापरला आयुक्तांचा ‘चेहरा’

By Admin | Updated: February 13, 2017 05:01 IST2017-02-13T05:01:31+5:302017-02-13T05:01:31+5:30

युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येती

BJP uses 'face' of commissioners | भाजपाने वापरला आयुक्तांचा ‘चेहरा’

भाजपाने वापरला आयुक्तांचा ‘चेहरा’

ठाणे : युती तुटल्यानंतर मतदारांपुढे जाण्यासाठी भाजपाकडे ठाण्यात सर्वांना अपील होईल, असा चांगला चेहरा नव्हता. सत्तेत सहभागी असल्याने स्वतंत्रपणे सांगता येतील, असे विकासाचे मुद्देही नव्हते. त्यामुळे कोणत्या आधारावर आपली ताकद वाढवायची, असा पेच होता. परंतु, ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारे, दलालांचे कंबरडे मोडणारे, रस्ता रुंदीकरणाचा धडाका लावत शहराच्या विकासाला दिशा देणारे आणि अनेक नवीन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची प्रतिमा आणि त्यांचे काम हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणत भाजपाने त्याचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केली. वस्तुत:, प्रशासकीय अधिकारी असल्याने पक्षातीत असलेला हा चेहरा भाजपाने आपल्या प्रचारात आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवा आणि ठाण्याच्या भाषणात त्यांच्या नावाचा थेट उल्लेख करत त्यांच्या कामाला पसंतीची पावती दिली. तसेच भाजपाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातही जयस्वाल यांच्या कामांचा उल्लेख करत त्यावर पसंतीची मोहोर उमटवली.
बकाल होत असलेल्या ठाण्याला दिशा देण्यासाठी, नागरी प्रश्न, अनधिकृत बांधकामे, रस्त्यालगतची बांधकामे, वाहतूककोंडी फोडणे आणि स्मार्ट ठाण्यासाठी अनेक नव्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज होती. आयुक्तपदी येताच धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असलेले संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. स्टेशन रोड ते जांभळीनाका, पोखरण एक-दोन, शास्त्रीनगर ते हत्तीपूल, घोडबंदर सर्व्हिस रोड, बाळकुम सर्व्हिस रोड, कळवा, मुंब्रा येथील अरुंद रस्ते मोठे केले. ती करताना रस्ते,
फुटपाथ अडवणारे गॅरेजवाले, बार, लेडिज बार यांच्यावर कारवाई केली. पारसिकचा खाडीकिनारा मोकळा केला. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले. यावर न थांबता विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वायफाय सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूककोंडी फोडण्यासाठी विविध योजना, हायटेक शिक्षण प्रणाली, नगरसेवकांची मोडून काढलेली दहशत आणि बाधितांचे पुनर्वसन यामुळे जयस्वाल सामान्यांच्या गळ्यातील ताईतच बनले. अनेक ठिकाणी त्यांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्वच्छ भारत अभियान, ब्रँडिंग ठाणे, ठाण्याला वेगळी ओळख, भिंती रंगवा अभियानामुळे शहर सुधारू लागले.
(प्रतिनिधी)

Web Title: BJP uses 'face' of commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.