भाजपात राडा, धक्काबुक्की

By Admin | Updated: February 4, 2017 03:28 IST2017-02-04T03:28:14+5:302017-02-04T03:28:14+5:30

ऐनवेळी मनसेतून भाजपात आलेल्या प्रतिमा मढवी आणि मृणाल पेंडसे यांना तिकीट दिल्याने गुरुवारी रात्री पक्षाच्या खोपट येथील कार्यालयात गोंधळ घालून भाजपाचे

BJP Rada, Shock | भाजपात राडा, धक्काबुक्की

भाजपात राडा, धक्काबुक्की

ठाणे : ऐनवेळी मनसेतून भाजपात आलेल्या प्रतिमा मढवी आणि मृणाल पेंडसे यांना तिकीट दिल्याने गुरुवारी रात्री पक्षाच्या खोपट येथील कार्यालयात गोंधळ घालून भाजपाचे नेते तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच शहराध्यक्ष संदीप लेले यांनाच काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तामध्ये तिकीटवाटपाची प्रक्रिया शिस्तीचे गोडवे गाणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना करावी लागली. शुक्रवारी दुपारीदेखील सागर बाबासाहेब कांबळे (२४) या कार्यकर्त्यावर दोन बाटल्या भिरकावल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्यामुळे संपूर्ण दिवसभर या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.
शुक्र वारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे गुरु वारी सायंकाळपासूनच अनेक इच्छुकांनी भाजपाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. त्यातच, व्हॉट्सअ‍ॅपवरून काही उमेदवारांच्या याद्या फिरल्याने ज्यांची नावे या यादीत नव्हती, त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. अनेकांनी या कार्यालयाकडे रात्री १० नंतर धाव घेतली. जे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना एबी फॉर्मचे वाटप चव्हाण आणि लेले यांच्याकडून सुरू होते. तितक्यात, नौपाड्यातील प्रभाग २१ अ मधून संजय वाघुले, ब - मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून अलीकडेच भाजपामध्ये दाखल झालेले राजेश मढवी यांची पत्नी प्रतिमा मढवी, क - मध्ये मृणाल पेंडसे, तर ड मधून सुनेश जोशी यांची नावे जाहीर झाल्यानंतर वाघुले आणि जोशी या दोन नावांव्यतिरिक्त मढवी आणि पेंडसे या दोन नावांना कार्यकर्त्यांनी विशेषत: महिलांनी जोरदार आक्षेप घेतला. हा गोंधळ इतका वाढला की, चव्हाण आणि लेले यांना तर काहींनी धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया काही काळ थांबवली. चव्हाण यांच्या अंगरक्षकांनी लेले यांच्या केबिनला बाहेरून लॉक केले. त्यानंतर, आत पोलीस संरक्षणात एबी फॉर्मचे वाटप झाले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP Rada, Shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.