भाजपाला हवा सत्तेत सहभाग
By Admin | Updated: May 23, 2016 02:30 IST2016-05-23T02:30:49+5:302016-05-23T02:30:49+5:30
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी भाजपा सौदेबाजीवर उतरली आहे. बदलापूरमध्ये युतीचा धर्म पाळा, असा संदेश देत भाजपाने सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे

भाजपाला हवा सत्तेत सहभाग
बदलापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी भाजपा सौदेबाजीवर उतरली आहे. बदलापूरमध्ये युतीचा धर्म पाळा, असा संदेश देत भाजपाने सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे. सत्तेत सहभागी न केल्यास भाजपाने अप्रत्यक्ष बंड करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सत्तेतील सहभागाचा निर्णय हा पालकमंत्र्यांमार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे. बदलापूरमधील भाजपा नेते पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी आतुर झाले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना विजयी करण्यासाठी पालकमंत्री यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजयासाठी आकडेवारी अनुकूल असली तरी भाजपाकडून दगाफटका होण्याची भीती सेनेला आहे. भाजपाने मते फिरवल्यास त्याचा सरळ फटका हा शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळे भाजपाच्या अपेक्षांकडे शिवसेना ‘अर्थपूर्ण’ लक्ष देत आहे. एवढेच नव्हे तर बदलापूरमध्ये भाजपाने थेट सत्तेत वाटा देण्याची मागणी करून सेनेला कोंडीत पकडले आहे. भाजपाचे २० नगरसेवक असल्याने ही मते फुटू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
बदलापूर पालिकेच्या विषय समितीची निवडणूक मंगळवारी असल्याने या निवडणुकीच्या आधी सत्तेतील सहभागावर निर्णय होणे अपेक्षित धरण्यात आले आहे. भाजपाच्या वतीने गटनेते राजन घोरपडे हे स्थानिक पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करत आहेत. त्यानंतर, यासंदर्भातील अंतिम निर्णय हे पालकमंत्री शिंदे घेणार आहेत. मात्र, शिंदे यासंदर्भात बैठकीचे आयोजन कधी करणार, याकडे बदलापुरातील नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे सत्तेचा वाटा देताना भाजपाने उपनगराध्यक्षपदासह दोन समित्यांची मागणी केली आहे. या मागणीबाबत सेना काय विचार करेल, हे अद्याप स्पष्ट नसले तरी सत्तेत सहभाग देण्याबाबत अनुकूलता दर्शवण्यात येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त बदलापुरातील भाजपाला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)