कार्यक्रम महापालिकेचा निमंत्रणपत्रिका भाजपची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:13 IST2019-09-01T00:12:53+5:302019-09-01T00:13:10+5:30

महापालिकेचे भार्इंदर पश्चिम येथील विनायकनगर सभागृहाचे उद््घाटन उद्या सायंकाळी होणार आहे

BJP Municipal Invitation Card | कार्यक्रम महापालिकेचा निमंत्रणपत्रिका भाजपची

कार्यक्रम महापालिकेचा निमंत्रणपत्रिका भाजपची

मीरा रोड : महापालिकेत सत्ताधारी आणि प्रमुखपदांवर असूनही भाजपने महापालिकेच्या मालमत्तांचे उद््घाटन, भूमिपूजन असताना त्याची निमंत्रण पत्रिका मात्र चक्क पक्षाची छापली आहे. भाजपची निमंत्रणपत्रिका स्वत: महापौरांपासून पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली आहे.

महापालिकेचे भार्इंदर पश्चिम येथील विनायकनगर सभागृहाचे उद््घाटन उद्या सायंकाळी होणार आहे. तर पश्चिमेच्याच कमला पार्क येथील अग्निशमन केंद्राच्या मुख्यालयाच्या जागेत सांस्कृतिक भवन - सभागृह बांधण्याचे भूमिपूजन सकाळी होणार आहे. या मालमत्ता महापालिकेच्या असून त्याच्या कामासाठी निधीही महापालिकेचा वापरला आहे. हे दोन्ही कार्यक्रम महापौर डिंपल मेहतांच्या हस्ते केले जाणार आहेत.
भाजपची पालिकेत एकहाती सत्ता आणि पदे असताना पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपच्या लोकप्रतिनिधींची नावे येणार हे स्पष्ट असतानाही भाजपने मात्र पक्षाची निमंत्रणपत्रिका छापून त्याचे सोशल मीडियापासून अन्यत्र वाटप केले आहे. भाजपच्या पत्रिकेवर प्रमुखांची तसेच पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे व नावे असून त्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचीही छायाचित्रे आहेत.
पालिकेकडून मात्र प्रशासनाने छापलेल्या पत्रिका देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या पत्रिकेत भूमिपूजन, उद्घाटन महापौरांच्या हस्ते होणार तसेच आमदार, पालिका पदाधिकारी यांची नावे त्यात असूनही भाजपने पालिकेच्या पत्रिकेला केराची टोपली दाखवली आहे. पालिकेची मालमत्ता आणि पालिकेचा कार्यक्रम असताना त्याच्या निमंत्रण पत्रिकाही पक्षाच्या छापल्यावरून भाजपवर टीका होत आहे. तर पालिका या प्रकरणी काय कारवाई करणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.
 

Web Title: BJP Municipal Invitation Card