मोराच्या गाडीच्या श्रेयासाठी भाजपा-मनसेत चढाओढ
By Admin | Updated: April 26, 2017 00:19 IST2017-04-26T00:19:26+5:302017-04-26T00:19:26+5:30
पूर्वेतील छत्रपती शिवाजी उद्यानातील मुलांचे आकर्षण असलेली मोराची गाडी तीन वर्षांपासून बंद होती. ही गाडी सुरू करण्यासाठी मनसेने मागील आठवड्यात

मोराच्या गाडीच्या श्रेयासाठी भाजपा-मनसेत चढाओढ
डोंबिवली : पूर्वेतील छत्रपती शिवाजी उद्यानातील मुलांचे आकर्षण असलेली मोराची गाडी तीन वर्षांपासून बंद होती. ही गाडी सुरू करण्यासाठी मनसेने मागील आठवड्यात अधिकाऱ्यांना मोरपीस देत आंदोलन केले होते. त्यानंतर या गाडीचे काम सुरू होत असल्याने मनसेला त्याचे श्रेय मिळू नये, यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांनी गाडी सुरू होणार आहे. त्यामुळे मुलांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी ९ वाजता या कामाचा शुभारंभ झाला. मात्र, त्याची माहिती महापालिका प्रशासनाला नव्हती. याप्रसंगी मोराच्या गाडीचा पाठपुरावा करणारे भाजपा नगरसेवक संदीप पुराणिक, राजन आभाळे, नगरसेविका खुशबू चौधरी, शहराध्यक्ष संजीव बिरवडकर, जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, नंदू जोशी, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते. या वेळी उद्यानात लावलेल्या फलकावर पुराणिक यांनी या कामाचा पाठपुरावा केल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
भाजपाने सगळ््यांनाच अंधारात ठेवून हे काम उरकून घेतले. त्यामुळे राज्यमंत्री व नगरसेवक यांच्या व्यतिरिक्त तेथे कोणीही उपस्थित नव्हते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची चाहूल लागल्यास ते तो उधळून लावतील, या भीतीपोटीच भाजपाने गुप्तता पाळली. असा गुपचूप कार्यक्रम करण्याची गरज काय, असा सवाल विविध स्तरातून उपस्थित होत आहे. पत्रकारांनाही या वेळी बोलावण्यात आले नव्हते.
मोराची गाडी सुरू व्हावी,
यासाठी पुराणिक २०१५ पासून पाठपुरावा करत होते. परंतु, त्यांनी त्याचे कधीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचा खुलासा भाजपाने केला. मनसेने केवळ लेटरबाजी व स्टंटबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, खरे श्रेय पुराणिक यांचेच आहे, असे भाजपाचे म्हणणे आहे. दरम्यान, उन्हाळ््याची निम्मी सुट्टी संपल्यानंतर गाडी सुरू होणार असल्याने अनेक पालक व मुलांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)