लोकमत न्यूज नेटवर्क , ठाणे : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध भाजपचे आमदार असा राजकीय सामना रंगल्याचे चित्र दिसून आले. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच बैठकीत भाजपच्या आमदारांनी निधी आणि समस्यांचा पाढा वाचत शिंदे यांना चक्रव्यूहात खेचण्याचा प्रयत्न केला. बैठकीच्या उत्तरार्धात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बैठकीला हजर झाले व त्यांनी शिंदेसेनेच्यावतीने किल्ला लढवला.
लवकरच वाढीव निधीचा विचारठाणे जिल्ह्यात भाजपने १०० टक्के यश मिळविले असून, त्यांचे नऊ आमदार आहेत तर शिंदेसेनेचे सहा आमदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. त्यामुळे भाजपमधील आमदार, नेते काहीसे नाराज आहेत.
बुधवारी झालेल्या पहिल्यावहिल्या बैठकीत आ. किसन कथोरे यांनी पर्यटनासाठी १० लाखांचा निधी देणार असाल तर देऊच नका, असा पवित्रा घेतला. विकासासाठी निधी वाढवून मिळावा, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली. राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा असल्याने थोडे सबुरीने घ्या, असा सल्ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मात्र, विकासकामे करण्यासाठी निधी आवश्यक असून, तो मिळावा यासाठी भाजपचे आमदार अडून बसल्याचे चित्र दिसले. अखेरीस शासनस्तरावर बैठक घेऊन लवकरच वाढीव निधीचा विचार केला जाईल, असे सूतोवाच शिंदे यांना करावे लागले.
शिंदेसेनेच्या तीन आमदारांची दांडी समितीची बैठक सुरू होताच भाजपचे किसन कथोरे, रवींद्र चव्हाण, नरेंद्र मेहता, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड या आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यांना उत्तरे देण्यात किंवा कुरघोडी करण्यात शिंदेसेनेचे आमदार कमी पडल्याचे दिसत होते. शिंदेसेनेच्या तीन आमदारांनी बैठकीला दांडी मारली होती. बैठक संपत असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हजर झाले. सरनाईक यांनी भाजपच्या सदस्यांना तोंड दिले.