BJP joins hands with ruling party for fear of defeat | पराभवाच्या भीतीने भाजपची सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी

पराभवाच्या भीतीने भाजपची सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी

उल्हासनगर : महापालिका विशेष समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना पराभवाच्या भीतीने भाजपने सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ९ पैकी ७ समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होणे बाकी आहे. तर दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना विरुद्ध भाजपचे उमेदवार उभे ठाकले आहेत.

उल्हासनगर महापालिकेच्या एकूण ९ विशेष समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी मुदत होती. विशेष समितीमध्ये ९ पैकी ५ सदस्य भाजपचे असून त्यांचे समितीत स्पष्ट बहुमत आहे. मात्र भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवक सत्ताधारी शिवसेना आघाडीसोबत असल्याने भाजपची कोंडी झाली. समिती निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने थेट शिवसेना आघाडीसोबत हातमिळवणी करून आरोग्य समिती व महिला व बालकल्याण अशा दोन समित्या पदरात पाडून घेतल्या. सार्वजनिक बांधकाम समिती, नियोजन विकास समिती, महसूल समिती अशा तीन समित्या ओमी टीम समर्थक नगरसेवकांना, शिक्षण समिती शिवसेनेला तर गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला गेली आहे. क्रीडा व समाजकल्याण समिती व पाणीपुरवठा समिती सभापती पदासाठी शिवसेना व भाजपने परस्परविरोधात अर्ज दाखल केल्याने ९ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी सर्वच समिती सभापती पदासाठी पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात भाजपने दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना आघाडी समोर लोटांगण घेतल्याची टीका होत आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सभापती पदाची निवडणूक होऊ नये म्हणून भाजपला दोन समित्या सोडल्याची प्रतिक्रिया दिली.

चौकट

पुरस्वानीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे

महापालिकेसह विशेष समितीमध्ये स्पष्ट बहुमत असताना विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुकीत माघार का? असा प्रश्न पक्षातून विचारला जात आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाल्यानंतर पक्षाचे महापालिकेत बहुमत असताना पराभवाचे धक्के एकापाठोपाठ बसत आहेत.

Web Title: BJP joins hands with ruling party for fear of defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.