भाजपाने गुंडांच्या मदतीने तिकिटे वाटली
By Admin | Updated: February 5, 2017 03:03 IST2017-02-05T03:03:22+5:302017-02-05T03:03:22+5:30
शहर भाजपाने उमेदवारयादी जाहीर केल्यानंतर कधी नव्हे अशी बंडखोरी उफाळून आली आहे. गुरुवारी राडे झाल्यानंतर शुक्रवारी अनेकांनी पक्षाविरोधात दंड थोपटून थेट सर्व्हे करणाऱ्या
भाजपाने गुंडांच्या मदतीने तिकिटे वाटली
ठाणे : शहर भाजपाने उमेदवारयादी जाहीर केल्यानंतर कधी नव्हे अशी बंडखोरी उफाळून आली आहे. गुरुवारी राडे झाल्यानंतर शुक्रवारी अनेकांनी पक्षाविरोधात दंड थोपटून थेट सर्व्हे करणाऱ्या शिवाजी गावडे ऊर्फ पाटील आणि श्वेता शालिनी या कंपनीवर गुंडांच्या मदतीने तिकिटांचे वाटप केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी एकत्र येऊन पक्षाविरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपाची उमेदवारयादी सादर झाली आणि या यादीत आयारामांबरोबर अनेक निनावी चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे तिकिटासाठी आस लावून बसलेल्या अनेकांना हा धक्का बसला. त्यामध्ये आमदार संजय केळकर यांच्या समर्थकांचा मोठा भरणा आहे. असे असले तरी आता ज्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे, ते एकत्र आले असून त्यांनी सर्व्हे करणाऱ्या शिवाजी गावडे (पाटील) आणि श्वेता शालिनी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी या सर्वांवर थेट आरोप करीत सर्व्हेवरदेखील आक्षेप घेतला आहे. कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार द्यावा, याबाबत गावडे आणि शालिनी यांनी मुलाखती घेतल्या होत्या. परंतु, येऊर येथील बंगल्यामधूनच त्यांनी परस्पर तिकीटवाटप केले. त्यातही जो सर्व्हे झाला, तो येऊरच्या बंगल्यात बसून झाल्याचा आक्षेपही या मंडळींनी घेतला आहे. तर, भाजपा हा गुंडांना पक्षात प्रवेश देत असून काही गुंडांच्या मदतीनेच पक्षात तिकीटवाटप केल्याचा आरोपही या नाराज मंडळींनी केला आहे. त्यामुळे अशा गुंडांना धडा शिकवण्यासाठी माजी उपमहापौर सुभाष काळे, सचिन आळशी, कैलास म्हात्रे, दत्ता घाडगे, प्रकाश नरसाणा, शशी यादव, सूर्यकांत चौधरी, रामचंद्र भोईर व इतर अनेक कार्यकर्त्यांनी आता अपक्ष अर्ज भरून या गुंडांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
उपऱ्यांना प्राधान्य देऊन निष्ठावंतांना नारळ
ठाणे शहर भाजपाने गुलदस्त्यात असलेली आपली यादी अखेर जाहीर केली. या यादीत आयारामांना अधिक पसंती दिली असून शिवाजी पाटील आणि श्वेता शालिनी यांच्या सर्व्हेत पास झालेल्यांचा वरचष्मा दिसून आला. परंतु, यामुळे अनेक निष्ठावान नाराज झाले असून त्यांनी या सर्व्हेलाच आव्हान देऊन बंडखोरी केली आहे. याशिवाय, पक्षाचे काम पाहणाऱ्या खासदार कपिल पाटील यांनी आपल्या नातेवाइकाला तिकीट मिळवून दिले आहे. तर, रवींद्र चव्हाण यांनीदेखील सर्व्हेचाच आधार घेऊन तिकीटवाटप केल्याने त्याचे परिणाम शहर भाजपात स्पष्ट उमटू लागले आहेत. परंतु, सुरुवातीपासून स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या अनेक समर्थकांचा पत्ता मात्र पक्षाने साफ केला आहे.
ठाणे शहर भाजपाने १२३ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. त्यातही शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून आलेल्या उपऱ्या आयारामांना संंधी दिली आहे. तसेच काही ठिकाणी कमकुवत उमेदवारही दिले आहेत. तर, संजय घाडीगावकर यांनी थेट पक्षविरोधी भूमिका घेऊन पक्ष सोडण्याची धमकी दिली होती. परंतु, दबाव आणून त्यांनी ९ तिकिटांचे सेटिंग करून घेतले. ते केळकर यांच्या गटातील मानले जातात. त्यामुळे घाडीगावकरांच्या निमित्ताने आ. केळकर यांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नव्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा मात्र पक्षाने किंबहुना शिवाजी पाटील आणि श्वेता शालिनी यांनी पत्ता साफ केल्याचा आरोप आता नाराज बंडोबांनी केला आहे. या दोघांनी केलेल्या सर्व्हेमध्ये जे पास झाले, त्यांनाच तिकीट दिल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)