कृषी बाजार समितीवर भाजपाचा झेंडा
By Admin | Updated: December 24, 2016 03:03 IST2016-12-24T03:03:49+5:302016-12-24T03:03:49+5:30
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे संख्याबळ जास्त असताना बाजार समितीच्या

कृषी बाजार समितीवर भाजपाचा झेंडा
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे संख्याबळ जास्त असताना बाजार समितीच्या सभापतीपदावर भाजपाचा झेंडा फडकला आहे. बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपा समर्थक रवींद्र घोडविंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षीय समीकरणापेक्षा जातीय समीकरणाने बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
वार्षिक सहा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. या मंडळात १२ पेक्षा जास्त सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. यापूर्वीचे सभापती अरुण पाटील हे देखील राष्ट्रवादीचे होते. त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी निवडणूक जाहीर झाली. राष्ट्रवादीचे सदस्य संख्याबळ जास्त असताना समितीच्या सभापतीपदाची संधी कुणबी समाजाच्या सदस्याला देण्याचा विचार पुढे आला. यापूर्वी सभापतीपद भूषवलेले सदस्य हे आगरी समाजाचे असल्याने आगरी समाजाला संधी मिळाली होती. संचालक सदस्य मंडळात घोडविंदे हे राष्ट्रवादीचे सदस्य होते.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केला. ते पुन्हा मुरबाड मतदारसंघातून भाजपातर्फे निवडून आले. कथोरे यांचे खंदे समर्थक म्हणून घोडविंदे यांची ओळख आहे. ते स्वत: शिक्षक होते. त्यांनी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात उडी घेतली. शिक्षण क्षेत्रात रस असलेल्या घोडविंदे यांनी गोवेली येथे महाविद्यालयाची उभारणी केली. या महाविद्यालयातून विविध समाजांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर घोडविंदे हे बाजार समितीच्या संचालक मंडळात सदस्यपदी निवडून आले. घोडविंदे यांना निवडून देण्यासाठी सर्व सदस्यांनी एकमोट बांधली. त्यामुळे तेथे पक्षीय राजकारण मागे पडले. समाजाच्या राजकारणाचा विजय होऊन घोडविंदे बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले आहे.
कथोरे २००४ पासून आमदार आहेत. आमदारकीची ही त्यांची तिसरी टर्म आहे. एकदा ते अंबरनाथ मतदारसंघातून निवडून आले. सलग दोन वेळा ते मुरबाड मतदारसंघातून निवडून आले. राष्ट्रवादीचे आमदार असताना त्यांनी विकासाभिमुख कामे केली. त्यामुळे त्यांची सामान्यांमध्ये एक चांगली प्रतिमा तयार झाली. भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतरही त्यांनी अनेक विकासकामे केली. अनेक योजना सुरू केल्या. अलीकडेच मुरबाड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला मारण्यासाठी त्यांनी सरकारकडून आदेश प्राप्त केले. त्यानंतर, नोटाबंदी झाली. तेव्हा धसई हे गाव कॅशलेस केले. तसेच शासकीय जत्रा भरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाची घोषणा करवून घेतली. राजकारणात आपल्या वर्चस्वाचा ठसा उमटवत असताना त्यांनी बाजार समितीच्या सभापतीपदी घोडविंदे यांना बिनविरोध निवडून आणले. एका प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देण्यात मला समाधान मिळाले असल्याची प्रतिक्रिया कथोरे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)