भाजपा नगरसेवकांचे पित्त खवळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:58 AM2019-01-22T00:58:42+5:302019-01-22T00:58:44+5:30

मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या तिघा नगरसेवकांनी उघडपणे सेटिंग, अ‍ॅडजस्टमेंट होत असल्याचा खळबळजनक खुलासा करत आमची कामे होत नाहीत

BJP corporators' bile blazes | भाजपा नगरसेवकांचे पित्त खवळले

भाजपा नगरसेवकांचे पित्त खवळले

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या तिघा नगरसेवकांनी उघडपणे सेटिंग, अ‍ॅडजस्टमेंट होत असल्याचा खळबळजनक खुलासा करत आमची कामे होत नाहीत, सभेत ठरावावर फक्त हातच वर करायचा का, असे घणाघाती प्रहार केल्यानंतर भाजपातील नाराजांनीही खाजगीत त्या तिघा नगरसेवकांच्या वक्तव्यांना दुजोरा देण्यास सुरुवात केली आहे. या नगरसेवकांनी दाखवलेल्या हिमतीचे कौतुक केले जात आहे.
या प्रकारानंतर भाजपातील ज्येष्ठांनी थेट आमदार नरेंद्र मेहतांवर टीकेची झोड उठवली असून दुसरीकडे स्थानिक नेतृत्वही असंतोष शमवण्याच्या हालचालींना लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
शनिवारची महासभा तहकूब करत महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती आदी निघून गेले. त्याचवेळी आयुक्त बालाजी खतगावकर सभागृहाबाहेर पडत असताना भाजपाचे नगरसेवक मुन्ना ऊर्फ प्रकाश सिंग यांनी आयुक्तांना अडवून २०१७-१८ च्या स्वच्छता सर्वेक्षणात विजेत्या प्रभागांची नावे आश्वासन देऊनही का जाहीर केली नाही, यावरून आयुक्तांना खडसावण्यास सुरुवात केली. आयुक्त निघून गेल्यानंतर संतप्त मुन्ना यांच्यासह अशोक तिवारी सभागृहातच ठिय्या मारून बसले. मुन्ना सिंग यांनी तर सर्व आपल्या परीने सेटिंग करून आणि मनाला वाटलं तेव्हा सभा तहकूब करून निघून जातात. त्यांची कामं झाली की झालं. हे सर्व मिळालेले आहेत. सत्ता पचवता येत नाही, अशा एका घणाघाती शब्दात महापौरांसह स्थानिक नेतृत्व व काही स्वपक्षाचे नगरसेवक यांच्यावर झोड उठवली होती. महापौरांशी फोनवर बोलण्यासही त्यांनी नकार दिला.
संतापलेल्या अशोक तिवारी यांनी तुम्ही अ‍ॅडजस्टमेंट करता, असे आ. मेहता समर्थक नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांना सुनावत आम्ही मूर्ख आहोत. महापौर निघून गेल्या आणि पक्षाचे नगरसेवकही गेले. कामांची वाट लागली आहे. पूर्वी कामे व्हायची, आज होत नाहीत, असा घणाघात केला. अनेक नगरसेवकांनी घडलेला प्रकार चुकीचा नसल्याचे म्हटले आहे. आमच्या प्रभागात आमची कामे होत नाही. अधिकारी ऐकत नाहीत. मेहता बोलतील तेवढेच ऐकतात. आमच्या प्रभागातील कामेही वरून ठरवली जातात. बोललं तर आम्ही वाईट यादीत टाकले जाऊ, अशा भावना खाजगीत व्यक्त केल्या.
>भाजपात कुठलाही अंतर्गत असंतोष नाही. उलट दोन महिन्यांपूर्वी आमदार नरेंद्र मेहता यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन प्रत्येकास त्यांच्या प्रभागात कामासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. मुन्ना सिंग यांची नाराजी कशामुळे होती, हे घटना घडल्यानंतर कळले.
- अनिल विराणी, नगरसेवक
>मुन्ना सिंग व अशोक तिवारी हे दोघेही मला भेटून गेले. त्यांची नाराजी केवळ उत्तर मिळाले नाही म्हणून होती. नगरसेवकांची कामे प्रशासन करत नाही, हे सत्य आहे. पण, त्यांच्या कामाबद्दल महापौरांनी चर्चा केली आहे. - नरेंद्र मेहता, आमदार

Web Title: BJP corporators' bile blazes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.