भाजपा, काँग्रेस, कोणार्कच केंद्रस्थानी राहणार
By Admin | Updated: April 20, 2017 04:11 IST2017-04-20T04:11:56+5:302017-04-20T04:11:56+5:30
मेट्रो प्रकल्पाची घोषणा, यंत्रमाग कामगारांना पॅकेज देत मोठ्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि अन्य पक्षातील उमेदवार फोडण्यासाठी गळ टाकलेल्या भाजपासाठी भिवंडी

भाजपा, काँग्रेस, कोणार्कच केंद्रस्थानी राहणार
भिवंडी : मेट्रो प्रकल्पाची घोषणा, यंत्रमाग कामगारांना पॅकेज देत मोठ्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि अन्य पक्षातील उमेदवार फोडण्यासाठी गळ टाकलेल्या भाजपासाठी भिवंडी पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून गेली दोन वर्षे त्यासाठी नियोजन करणाऱ्या खासदार कपिल पाटील यांच्यासाठी तो अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.
त्याचबरोबर दीर्घकाळ आपले वर्चस्व टिकवून असलेल्या काँग्रेसलाही अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे. अन्य सर्व पक्षांचा आसरा म्हणून कोणार्क आघाडी शेवटच्या काही दिवसांत उसळी घेऊन वर येईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
पालिका निवडणुकीची बुधवारी घोषणा होताच राजकीय घडामोडींना खास करून उशिरा होणाऱ्या गाठीभेटींना वेग आला आहे. येत्या दहा दिवसांत पक्षीय पातळीवर, आघाडी करण्याच्या दृष्टीने घडामोडी घडत जातील. २९ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असली, तरी नेमके चित्र ५ आणि ६ मे रोजीच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
भाजपाप्रणित आघाडीला तोंड देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काही मुस्लिम गटांना एकत्र आणून पर्यायी धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी चालवला आहे. त्याचवेळी कोणार्क आघाडीही सक्रिय झाली आहे. त्यामुळे या तीन आघाड्या आणि त्यापेक्षा वेगळी चूल मांडणारी शिवसेना याभोवतीच निवडणूक फिरण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या कमळ चिन्हापेक्षा कोणार्क आघाडीचा पर्याय अनेक छोटे पक्ष निवडण्याची शक्यता आहे. नंतर या आघाडीची मदत घेत भाजपाने सत्तेसाठी प्रयत्न करावेत, अशी खलबते सध्या सुरू असल्याचे राजकीय वर्तुळातील कार्यकर्ते सांगत आहेत. (प्रतिनिधी)