बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: January 23, 2024 19:44 IST2024-01-23T19:44:23+5:302024-01-23T19:44:29+5:30
अल्पवयीन मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला शरीर विक्रयाच्या अनैतिक व्यवसायामध्ये अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचला मिळाली होती.

बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक
ठाणे: बिहारच्या एका १५ वर्षीय मुलीला ठाण्यात आणून तिचा पाच लाखांमध्ये सौदा करुन विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या श्रवणकुमार सुदामा चौधरी (२६, जिल्हा औरंगाबाद, बिहार) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्याच्याकडून या पिडित मुलीची सुटकाही करण्यात आली आहे. बिहारच्या एका अल्पवयीन मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला शरीर विक्रयाच्या अनैतिक व्यवसायामध्ये अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचला मिळाली होती.
त्याच माहितीच्या आधारे २३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने या अल्पवयीन मुलीचा ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका हॉटेलमध्ये सौदा करुन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रवणकुमार याला संयुक्त कारवाईमध्ये रांगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे मुलींची विक्री केली आहे का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.