Shiv Sena Shinde Group News: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील नेते, पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत असून, शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करताना दिसत आहेत. आगामी मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसून, हा ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. यातच मुंबई, पुण्यानंतर आता ठाण्यातही ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. माजी विभागप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
एकीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबईत पालिकेची निवडणूक जेव्हा जाहीर होईल तेव्हा मुंबईतील सर्व प्रभागात लढता येतील एवढे उमेदवार जमवण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाकरे गटाला ठाण्यात खिंडार; माजी विभागप्रमुख शिंदेसेनेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. ठाणे शहरातील नववर्ष स्वागत यात्रेचा जल्लोष सुरू असतानाच नौपाडा येथील ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख प्रकाश पायरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी मुंबई, पुणे व रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाकरेंचे एक-एक उमेदवार गळाला लावण्यात शिंदे यशस्वी होत आहेत. मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिंदे गटात प्रवेश केला.