दिव्यांगांसाठी आणलेल्या सायकली धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:09 IST2018-12-13T23:08:47+5:302018-12-13T23:09:14+5:30
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान ज्या सायकली शिल्लक राहिल्या होत्या त्या सायकली पालिकेच्या आवारात धूळखात आहेत.

दिव्यांगांसाठी आणलेल्या सायकली धूळखात
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान ज्या सायकली शिल्लक राहिल्या होत्या त्या सायकली पालिकेच्या आवारात धूळखात आहेत.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत अंबरनाथ नगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य आणि पेन्शन वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी आणलेल्या सायकली काही प्रमाणात शिल्लक राहिल्या होत्या. या सायकली गरजूंना वाटप करणे आवश्यक होते. मात्र त्यातील अनेक सायकली या अजूनही पालिकेच्या कार्यालयात पडून राहिल्या आहेत. त्यातील काही सायकलींना गंजही लागला आहे. पालिकेच्या उत्पन्नाचा तीन टक्के हिस्सा हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने एक कोटी ९० लाख खर्च करून ५४ दिव्यांगांना विविध साहित्य आणि पेन्शनचे वापट करण्यात आले. पालिकेच्या वतीने प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. त्याचा लाभही दिव्यांगांनी घेतला. मात्र या कार्यक्रमानंतर शिल्लक राहिलेल्या दिव्यांगांच्या सायकली या अजूनही पालिकेत धूळखात आहेत. या सायकली खराब होण्याआधी त्याचेही वापट होणे गरजेचे आहे. सायकलीसोबत दिव्यांगांनी ज्या वस्तू नेल्या नाहीत त्यातील जयपूर फूट तीन, तीन चाकी सायकल चार, व्हीलचेअर चार, कुबड्या चार, निकेज दोन, कॉपर चार, ब्रेल किट एक, वॉकर एक, वॉकिंग स्टीक तेरा, श्रवणयंत्र तीन, पिठाची गिरणी एक, जयपूर हॅण्ड तीन असे साहित्य अजूनही पडून आहे.