भिवंडीत पाईपलाईन फुटली; व्हॉल्वमधून लाखो लिटर पाण्याच्या नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 17:50 IST2021-12-11T17:48:58+5:302021-12-11T17:50:56+5:30
मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी वैतरणा धरणातून आलेली पाईपलाईन ही ९६ इंचची असून या पाइपलाईनच्या वरच्या बाजूने असलेले व्हॉल्व्ह शनिवारी दुपारी अचानक फुटल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

भिवंडीत पाईपलाईन फुटली; व्हॉल्वमधून लाखो लिटर पाण्याच्या नासाडी
भिवंडी- भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई महानगरपालिकेची वैतरणा पाईपलाईनचे व्हॉल्व निघाल्याने पाईपलाईन मधून सुमारे ५० ते ६० फूटांपर्यंत पाण्याची कारंजी उडत असून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. यामुळे पाइपलाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला होणारा कोटयवधी खर्चावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी वैतरणा धरणातून आलेली पाईपलाईन ही ९६ इंचची असून या पाइपलाईनच्या वरच्या बाजूने असलेले व्हॉल्व्ह शनिवारी दुपारी अचानक फुटल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला व पाण्याची कारंजी वरपर्यंत उडत होती. या घटनेने पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती तर दुसरीकडे उंच उडणाऱ्या कारंजाचा आनंद घेण्यासाठी काही नागरिकांनी गर्दी केली होती . दरम्यान मनपाच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली आहे.