भिवंडी महापालिका मतदार याद्यांमध्ये घोळ
By Admin | Updated: April 22, 2017 00:10 IST2017-04-22T00:05:44+5:302017-04-22T00:10:21+5:30
भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये ५० हजार ९२२ बोगस मतदारांचा समावेश असल्याने उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक

भिवंडी महापालिका मतदार याद्यांमध्ये घोळ
मुंबई : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये ५० हजार ९२२ बोगस मतदारांचा समावेश असल्याने उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले. मतदार याद्यांत घोळ असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर कसा केला? मतदार याद्या कोण दुरुस्त करणार, अशी प्रश्नांची सरबत्ती करत उच्च न्यायालयाने २४ एप्रिलला केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
भिवंडी महापालिकेची निवडणूक येत्या २४ मे रोजी आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या सदोष असल्याने या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी भिवंडीच्या फैजल अन्सारी, संजय काबुकर आणि सिद्धेश्वर कामूर्ती यांनी उच्च न्याायालयात धाव घेतली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
याचिकांनुसार, भिवंडीच्या मतदार याद्यांमध्ये एकूण ५० हजार ९२२ मतदार बोगस आहेत. प्रभाग क्रमांक १७ व १८मध्ये सुमारे दोन ते तीन हजार मतदारांची नावे दोनदा आली
आहेत. हा घोळ निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून
दिला तरीही त्यांनी यादीत दुरुस्ती करण्यास नकार दिला. मतदार याद्यांतील बोगस नावे वगळण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
२४ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हजर रहावे
- ‘याद्या सदोष आहेत, हे माहीत असूनसुद्धा तुम्ही (आयुक्त) निवडणूक कार्यक्रम का जाहीर केलात? या याद्या कोण बनवतं? या घोळाला जबाबदार कोण आणि या याद्या दोषविरहित कोण करणार,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांकडे केली.
- या याद्या केंद्रीय निवडणूक आयोग तयार करत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर उच्च न्यायालयाने २४ एप्रिलला केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.