भिवंडीत कंत्राटदार जोमात, तर रस्ते कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:00+5:302021-09-26T04:44:00+5:30
भिवंडी : शहरात खड्ड्यांमधून रस्ता शाेधावा लागत आहे, अशी परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर माेठमाेठ्या खड्ड्यांमध्ये चिखलपाण्याची डबकी ...

भिवंडीत कंत्राटदार जोमात, तर रस्ते कोमात
भिवंडी : शहरात खड्ड्यांमधून रस्ता शाेधावा लागत आहे, अशी परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर माेठमाेठ्या खड्ड्यांमध्ये चिखलपाण्याची डबकी साचली आहेत. त्यातून नागरिकांना माेठ्या काैशल्याने मार्ग काढण्याचे दिव्य पार पाडावे लागत असून, चिखलामुळे दुचाकी घसरून अपघातांची मालिकाच सुरू आहे. भिवंडी महापालिका प्रशासन मात्र कंत्राटदारावर काेणतीही कारवाई न करता केवळ रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश देऊन हात झटकत असल्यामुळे खड्ड्यांची पिडा संपता संपत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भिवंडीतील बहुतांश डांबरी रस्ते हे ईगल इन्फ्रा कंपनीने तयार केले आहेत. निकृष्ट दर्जामुळे नागरिकांना त्यावरून प्रवास करताना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. मागील वर्षी धामणकर नाका ते कामतघर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर केमिकलमिश्रित डांबर टाकल्याची पोलखोल स्थानिकांनी केली होती. मनपा प्रशासनाने या कंत्राटदारावर कारवाई न करता या कंपनीस रस्त्याचा काही भाग दुरुस्त करण्यास सांगितले. प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे शहरातील रस्ते खड्ड्यांत गेले असल्याचा आराेप करण्यात येत आहे.
भिवंडीतील माणकोली-अंजूरफाटा ते चिंचोटी या महामार्गावर सुप्रीम कंपनी टाेलवसुली करीत आहे. त्यामुळे टाेलवसुली जोमात तर रस्ते कोमात अशी या महामार्गाची स्थिती आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सात कोटी रुपये मंजूर केले होते. तेव्हा रस्ता दुरुस्तीचे काम मयूर कन्स्ट्रक्शन या खासगी ठेकेदाराने केले. मात्र, या कंत्राटदारानेही सुप्रीमच्याच पावलावर पाऊल ठेवल्याने सात कोटींचा चुराडा झाला.
भिवंडी-वाडा रस्त्याची दुरवस्था
भिवंडी-वाडा महामार्गाचीही हीच स्थिती आहे. येथे सुप्रीम कंपनी टाेल वसूल करीत होती. मात्र, दोन वर्षांपासून टोलनाका बंद असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम आहे. या रस्त्याच्या डागडुजीचा ठेका मयूर कन्स्ट्रक्शनकडे आहे. आतापर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीवर तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये भिवंडी-वडप मार्गाची दुरुस्तीही मयूर कन्स्ट्रक्शनने केली आहे. या सर्वच ठेकेदारांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदारांना प्रशासनाची कोणतीही भीती राहिलेली नाही.