भिवंडीत आयप्पा मंदिरातील दानपेट्या फोडून रोकड पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:39+5:302021-03-23T04:42:39+5:30
वऱ्हाळ देवी चौक या ठिकाणी हे मंदिर असून, सकाळी नियमित पूजा करण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्याने मुख्य दरवाजा उघडला असता त्यांना ...

भिवंडीत आयप्पा मंदिरातील दानपेट्या फोडून रोकड पळविली
वऱ्हाळ देवी चौक या ठिकाणी हे मंदिर असून, सकाळी नियमित पूजा करण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्याने मुख्य दरवाजा उघडला असता त्यांना मंदिरातील चार दानपेट्या फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब तात्काळ मंदिर व्यवस्थापक विश्वनाथ शेट्टी यांना कळविली असता त्यांनी शहर पोलिसांना खबर दिली. या मंदिराचा मागील लाकडी दरवाजा लोखंडी पाइपने तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरली. यातील एक दानपेटी चोरट्यांना उघडता न आल्याने त्यांनी ती दानपेटी काही अंतरावर नेऊन दगडावर आपटून फोडली. या घटनेबाबत शेट्टी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
१३ फेब्रुवारी रोजी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला होता. त्यावेळी दानपेटीतील रक्कम काढण्यात आली होती. तरीही सुमारे १२ हजार रुपयांची रक्कम चोरी झाल्याचा संशय आहे. शहर पोलीस ठाण्यांतर्गत वऱ्हाळ देवी चौक परिसरात नियमित गस्त व बंदोबस्त असून, शनिवारी रात्री या ठिकाणी नाकाबंदीदेखील लावण्यात आली होती. तरीसुद्धा हाकेच्या अंतरावरील मंदिरात चोरी झाल्याने आयप्पा स्वामींच्या भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.