भाटिया हत्येप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: March 28, 2016 02:00 IST2016-03-28T02:00:31+5:302016-03-28T02:00:31+5:30
वांगणीत झालेल्या पितांबर भाटिया (७०) या ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, शनिवारी रायगड जिल्ह्यातील बेडीसगाव येथून पोलिसांनी तिघांना अटक

भाटिया हत्येप्रकरणी तिघांना अटक
बदलापूर : वांगणीत झालेल्या पितांबर भाटिया (७०) या ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, शनिवारी रायगड जिल्ह्यातील बेडीसगाव येथून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांनी चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काशिनाथ पुजारा (२८), रवींद्र वारे (३०), अरु ण भवारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वांगणीतील पितांबर भाटिया (७०) यांची हत्या करण्यात आली. भाटिया एकटेच बंगल्यात राहत असल्याचे पुजारा याला माहीत असल्यामुळे त्याने रवींद्र व अरु ण यांच्यासह चोरी करण्याच्या उद्देशाने बंगल्यात प्रवेश केला. त्या वेळी आवाज आल्याने भाटिया मुख्य दरवाजा उघडून बंगल्याच्या बाहेर आले. काशिनाथ याला भाटिया यांनी ओळखले. भाटिया पोलिसात तक्रार करतील, या भीतीने तिघांनी भाटिया यांची हत्या केली आणि ते पळून गेले.
१५ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील काशिनाथ पुजारा व त्याच्या दोन मित्रांनी भाटिया यांच्या बंगल्यातील नारळाचे एक झाड तोडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांची एकत्र व स्वतंत्रपणे चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळली. त्यानंतर, पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी एच.टी. व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके स्थापन करून या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, एस.बी. हरगुडे, हवालदार के.एन. काशिवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)
- २१ मार्चला सकाळी बंगल्याच्या मुख्य दरवाजात भाटिया यांचा मृतदेह आढळला. चोरट्यांनी त्यांची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त
होत होता. मात्र, घरातील कोणतेही सामान चोरीला गेलेले नव्हते. त्यामुळे भाटिया यांची हत्या कोणी व कशासाठी केली, असा प्रश्न पोलिसांसमोर होता.
- भाटिया यांना मूलबाळ नव्हते. पाच वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्याने ते एकटेच बंगल्यात राहत होते.