भार्इंदर पालिकेला डॉक्टरची नोटीस
By Admin | Updated: April 20, 2017 04:07 IST2017-04-20T04:07:47+5:302017-04-20T04:07:47+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेत कार्यरत असतानाही डॉ. मकरंद फुलझेले खाजगी प्रॅक्टिस करत असल्याने पालिकेकडून त्यांना दिला जाणारा भत्ता वसूल करण्याची मागणी

भार्इंदर पालिकेला डॉक्टरची नोटीस
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेत कार्यरत असतानाही डॉ. मकरंद फुलझेले खाजगी प्रॅक्टिस करत असल्याने पालिकेकडून त्यांना दिला जाणारा भत्ता वसूल करण्याची मागणी झाल्याने त्याबाबतची चौकशी सुरू झाल्याने ती थांबवावी, या मागणीसाठी त्या डॉक्टरांनी पालिकेला एक कोटीची अब्रूनुकसानीची नोटीस बजावली आहे.
मी मागासवर्गीय असल्याने ही चौकशी सुरू असल्याचा, त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचा आणि वैद्यक विश्वात बदनामी झाल्याचा मुद्दा त्यांनी या नोटिशीत मांडला आहे. पालिकेच्या इतिहासात डॉक्टरांकडून आलेली ही पहिलीच नोटीस आहे.
पालिकेने मीरा रोड येथे २०१० मध्ये सुरु केलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयात २४ मार्च २०११ ला डॉ. फुलझेले यांची रुग्णालय अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या कार्यकाळात कामाबद्दल तक्रार नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजपा नगरसेविका डॉ. वसाणी यांनी फुलझेले खाजगी दवाखाना चालवून रुग्णसेवा देत असल्याची बाब पुढे आणली. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार हे कृत्य बेकायदा असल्याने खाजगी रुग्ण सेवा न देण्यापोटी फुलझेले यांना दिला जाणारा एनपीए (नॉ प्रॅक्टिस अलाऊंस) पालिकेने थांबवावा व आजवर दिलेला भत्ता वसूल करावा, अशी तक्रार त्यांनी गेल्यावर्षी १३ मार्चला वैद्यकीय विभागाकडे केली. फुलझेले चालवत असलेल्या खाजगी दवाखान्याची नोंद पालिकेच्या दफ्तरी नसल्याचा दावा वसाणी यांनी केला. नोंद नसलेल्या दवाखान्यामार्फत रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालविला असल्याची बाब त्यांनी वैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आणली. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने वैद्यकीय विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यामार्फत फुलझेले यांची विभागीय चौकशी सुरु केली आणि चौकशीबाबत सामान्य प्रशासन विभागाने गेल्यावर्षी १९ मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. फुलझेले यांनी नोटिशीतील आरोपांचे खंडन केले व त्याचे उत्तर सामान्य प्रशासन विभागाला दिले. खाजगी रुग्णसेवेबाबत सविस्तर माहिती दिली नसल्याचा उल्लेख त्यात त्यांनी केला. सामान्य प्रशासनाने त्यांचे उत्तर अमान्य करीत शिस्तभंगाची नोटीस बजावली. पालिकेने आपल्यावर एकतर्फी कारवाई चालविल्याचा आरोप करीत फुलझेले यांनी वसाणी यांच्या तक्रारींना आधार नसल्याचा दावा केला. मी मागासवर्गीय असल्याच्या भावनेतून तक्रारी करण्याचा सपाटा नगरसेविकेने लावल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)