भार्इंदरच्या स्थायीची नालेसफाईला मंजुरी
By Admin | Updated: May 14, 2016 00:46 IST2016-05-14T00:46:34+5:302016-05-14T00:46:34+5:30
शहरातील नालेसफाईसाठी ५० लाखांऐवजी दीड कोटींचा निधी मिळावा, यासाठी ७ मे च्या महासभेत प्रस्ताव सादर होण्यापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुक ीची आचारसंहिता लागू झाली

भार्इंदरच्या स्थायीची नालेसफाईला मंजुरी
भार्इंदर : शहरातील नालेसफाईसाठी ५० लाखांऐवजी दीड कोटींचा निधी मिळावा, यासाठी ७ मे च्या महासभेत प्रस्ताव सादर होण्यापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुक ीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे वाढीव निधीच्या मंजुरीसाठी किमान स्थायीच्या बैठकीला मान्यता मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने थेट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. अखेर, त्यास मान्यता मिळाल्याने शुक्रवारी झालेल्या स्थायी बैठकीत नालेसफाईला मंजुरी देण्यात आली. परंतु, सध्या नालेसफाईसाठी ५० लाखांचाच निधी मंजूर करण्यात आला.
शहरात १५५ लहानमोठे नाले आहेत. महापालिका दरवर्षी मे महिन्यात नालेसफाई हाती घेते. ही कामे १० ते १६ जूनदरम्यान पूर्ण होतात. या सफाईसाठी प्रशासन दोन वर्षांपासून आरोग्य विभागाला दीड कोटीचा निधी देत आहे. यंदाही अंदाजपत्रकात विविध सफाई मोहिमांसाठी प्रशासनाने ६५ कोटींची तरतूद केली होती. त्यात स्थायीने १५ कोटींची वाढ केल्याने यंदाच्या नालेसफाईसाठी मागील वर्षाप्रमाणेच निधी मिळण्याची शक्यता असतानाच तो थेट ५० लाखांवर आणला गेला. एवढ्या कमी खर्चात नालेसफाई करणे अवघड असल्याने आरोग्य विभागाने सफाईलाच विरोध केला. नालेसफाईसाठी दीड कोटीचाच निधी मिळावा, यासाठी विभागाने ७ मे च्या महासभेची मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार केला.
परंतु, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता महासभेच्या आदल्या दिवशीच लागू झाली. त्यामुळे सभेला स्थगिती देण्यात आली. यामुळे वाढीव निधीच्या मंजुरीसाठी किमान स्थायीच्या बैठकीला मान्यता मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे घातले. ७ मे रोजी पाठवलेल्या पत्रावर निवडणूक प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. यामुळे हवालदिल झालेले विभागाचे प्रमुख, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी स्वत:च निवडणूक प्रशासनाकडे १२ मे रोजी धाव घेत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगितले. अखेर, निवडणूक प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीला मान्यता दिली. त्यामुळे शुक्रवारी बैठक घेण्यात आली.