भार्इंदर पालिकेत सुरू आहे अजब कारभार
By Admin | Updated: February 13, 2017 04:59 IST2017-02-13T04:59:05+5:302017-02-13T04:59:05+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेची विकासकामे निकृष्ट दर्जाची व त्यातील घोटाळ्यांच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यातच, कामाच्या ठिकाणी

भार्इंदर पालिकेत सुरू आहे अजब कारभार
धीरज परब / मीरा रोड
मीरा-भार्इंदर महापालिकेची विकासकामे निकृष्ट दर्जाची व त्यातील घोटाळ्यांच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यातच, कामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी अभियंत्यांची गरज असताना चक्क शिपाई नियुक्त केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे कोट्यवधी खर्च करून केल्या जाणाऱ्या पालिकेच्या कामांच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विकासकामे मिळवण्यासाठी कंत्राटदार व लोकप्रतिनिधींमध्ये चालणारी साठमारी, अधिकाऱ्यांचे असलेले लागेबांधे हा अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. टक्केवारी व अनेकांना सांभाळण्याची कसरत करावी लागत असल्याने कंत्राटदारा कडून निकृष्ट दर्जाची कामे होतात. कामांचा दर्जाच टिकवण्यात येत नसल्याने कालांतराने पुन्हा तीच कामे काढली जातात. वास्तविक, कामे होत असताना कनिष्ठ अभियंत्यांनी लक्ष देणे आवश्यक असते. वापरण्यात येणारे साहित्य व प्रमाण याचा दर्जा काटेकोरपणे तपासला गेला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. पालिकेकडे कनिष्ठ अभियंत्यांची संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे केले जाते.
भार्इंदर पश्चिमेस सुभाषचंद्र बोस मैदान प्रवेशद्वाराच्या बाजूला पालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. सोलिंग, ग्राउंटिंग करून डांबरी रस्ता तयार करावा लागतो. पण, येथे खडी व डांबरीकरणाचे काम सुरू असताना चक्क मनोहर भोईर हे पालिकेचे शिपाई येथे सुपरवायझर म्हणून काम पाहत होते. भोईर यांना याबाबत विचारणा केली असता अधिकारी निवडणूक कामासाठी गेल्याने आपण कामावर देखरेख करत असल्याचे ते म्हणाले. रस्त्याची लेव्हल बरोबर आहे का? खड्डा वगैरे नाहीना, ते पाहतोय. परंतु, तुम्ही शिपाई आहात, रस्त्याचे काम तांत्रिक आहे. ते तुम्हाला कसे काय कळणार, या प्रश्नावर मात्र हसून त्यांनी बोलणे टाळले.