भार्इंदर महापालिकेत टेंडर घोटाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 02:14 IST2016-07-12T02:14:21+5:302016-07-12T02:14:21+5:30
आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच कंत्राटे मिळावी, यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई करणे, फेरनिविदा मागवणे, निविदा मागे घेणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले

भार्इंदर महापालिकेत टेंडर घोटाळा!
मीरा रोड : आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच कंत्राटे मिळावी, यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई करणे, फेरनिविदा मागवणे, निविदा मागे घेणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामुळे मीरा-भार्इंदर महापालिकेत सुरू असलेला टेंडर घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. तर, या घोटाळ्यामुळे शहरातील विकासकामे मात्र रखडली असून दुसरीकडे सत्ताधारी यांच्यातील निविदा मिळवण्यावरून सुरू असलेली अंतर्गत साठमारी चर्चेचा विषय ठरली आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपा, शिवसेना व बविआ युतीची सत्ता असून भाजपाच्या गीता जैन महापौर, तर सेनेचे प्रवीण पाटील उपमहापौर आहेत. पण, पालिकेसह स्वपक्षात भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याखालोखाल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे वर्चस्व आहे. पालिकेच्या विविध कामांची कंत्राटे घेण्यावरून सध्या जोरदार लॉबिंग सुरू असल्याचा कळीचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच, कंत्राट आपापल्या मर्जीतील वा अर्थपूर्ण कारणांशी संबंधित कंत्राटदारांना मिळावे, यासाठी काही महिन्यांपासून साठमारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर निविदा सूचना क्रमांक २८३ प्रसिद्ध केली होती. कोट्यवधींची तब्बल ४१ कामे काढली होती. त्यापैकी ११ कामांसाठी कोणतेही सबळ कारण नसताना स्थायी समितीने फेरनिविदा मागवण्याचा ठराव केला. विशिष्ट कंपन्यांनी केलेली स्पर्धा व त्यांना कामे न मिळता आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावी, यासाठी फेरनिविदा मागवण्याचा घाट घातला जात आहे. १७ मार्च ही निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत, तर दुसऱ्या दिवशी निविदा उघडण्याची तारीख होती. गटारे बांधून स्लॅब टाकण्यासाठी असलेली ही कामे ३० लाखांपासून १ कोटी किमतीची होती. जवळपास सर्वच कामांची मुदत चार महिन्यांची होती. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने निव्वळ स्पर्धा होऊ न देता मर्जीतल्या कंत्राटदारांनाच कामे मिळावी, यासाठी गेल्या वर्षापासून ही सर्व कामे रखडवली.
असाच प्रकार पालिकेने मार्च २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या निविदा सूचना क्रमांक ४५२ च्या बाबतीत घडला. या सूचनेद्वारे पालिकेने तब्बल ३५ कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. यातील कामे १० लाखांपासून ४ कोटी ३८ लाखांपर्यंतच्या किमतीची होती. शहरातील विविध विकासकामांचा समावेश असलेल्या या निविदा सूचनेत कामांची मुदत दोन महिन्यांपासून वर्षभराची होती. कोट्यवधींच्या कामांच्या निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१६ ही होती. १ एप्रिल रोजी निविदा उघडायची होती. परंतु, प्रशासनानेही निविदा उघडणे, छाननी करणे व त्यास निविदा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यासाठी कमालीची दिरंगाई केली. पावसाळा तोंडावर असल्याने मार्च,एप्रिलमध्येच निविदा मंजूर करून पालिकेने कार्यादेश देणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी पालिकेने तब्बल जूनअखेरपर्यंत वेळकाढूपणा केला, जेणेकरून अनेक विकासकामे होणार होती, तीदेखील बारगळली. (प्रतिनिधी)