सदोष मीटरमुळे भाईंदरला पाणीकपात
By Admin | Updated: March 31, 2016 02:51 IST2016-03-31T02:51:46+5:302016-03-31T02:51:46+5:30
शहराला स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सदोष मीटरमुळे रोज १० ते १५ एमएलडी पुरवठ्याला मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा कमी होत असला तरी मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत

सदोष मीटरमुळे भाईंदरला पाणीकपात
भार्इंदर : शहराला स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सदोष मीटरमुळे रोज १० ते १५ एमएलडी पुरवठ्याला मुकावे लागत आहे. पाणीपुरवठा कमी होत असला तरी मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत असल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे. या तांत्रिक पाणीकपातीची समस्या महापौर गीता जैन यांनी स्टेमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत सदोष मीटरची दुरुस्ती करण्याची मागणी स्टेमकडे केली आहे.
शहराला स्टेमद्वारे ८६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. स्टेमच्या अभियंत्यांनी मीरा-भार्इंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या चेना येथील मुख्य जलवाहिनीवर बसवलेल्या मीटरची नुकतीच चाचपणी केली. त्या वेळी त्यांनी मीटरमधील काही तांत्रिक दोष दुरुस्त करून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मोजणीला सुरुवात केली. मीटर दुरुस्तीनंतर प्रत्यक्षात होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० ते १५ एमएलडीची घट होऊनही मीटरचे रीडिंग मात्र अचूक येत असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आले.
त्यांनी त्वरित याची माहिती स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक कर्नल चौधरी व महाव्यवस्थापक शशिकांत साळुंखे यांना देत मीटर दुरुस्तीची मागणी केली. त्यावर, दोन्ही प्रशासनांत वाद निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने थेट महापौरांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार, महापौर
गीता जैन यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदोष मीटरची दुरुस्ती करून शहराच्या वाट्याला मिळालेले पाणी देण्याचे आदेश दिले. उद्या सदोष मीटरच्या दुरुस्तीसाठी स्टेमचे अधिकारी येणार असून आठ दिवसांपासून सुमारे १२० एमएलडी कमी मिळालेल्या पाण्यावरही चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
याला स्टेमच्या महाव्यवस्थापकांनीसुद्धा दुजोरा दिला. काही दिवसांतच सदोष मीटर बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)