भानभित्रानी भरलंय सारं रान
By Admin | Updated: October 12, 2016 04:22 IST2016-10-12T04:22:47+5:302016-10-12T04:22:47+5:30
शहापूर तालुक्याच्या जंगलात सर्वत्र रानातील रानमेवा म्हणून परिचित असलेली काळीभोर भानभित्रे नावाची लहानलहान फळे सर्वत्र पाहवयास मिळत

भानभित्रानी भरलंय सारं रान
भातसानगर : शहापूर तालुक्याच्या जंगलात सर्वत्र रानातील रानमेवा म्हणून परिचित असलेली काळीभोर भानभित्रे नावाची लहानलहान फळे सर्वत्र पाहवयास मिळत असून शेतावर कापणीसाठी गेलेले शेतकरी त्यावर ताव मारत असल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील जंगलमय भागात मोठ्या प्रमाणात दिसणारी भानभित्रे ही झाडावर गुच्छाच्या रु पात आढळतात. सुरुवातीला ती हिरवीगार असतात. एका एका गुच्छ्यात ती दीडशे ते दोनशे फळे असतात. ती भातिपकाच्या कापणीच्या वेळी पिकून काळीभोर होतात. ती खायला गोड पण थोडीशी तुरट असतात. परंतु, ती खायची मजा मात्र औरच असते. या फळात लहानलहान चार बियाही असतात, त्या टाकून दिल्या की भानभित्रे खाल्ल्याचे समाधान वेगळेच.
आज तालुक्याच्या भातसानगर, कसारा, तानसा, वैतरणासह साऱ्याच जंगलमय भागात ती मोठ्याप्रमाणात आढळत आहेत. ती खाण्यासाठी गुरे चारणारी, बकऱ्या चारणारे दररोज दाट जंगलात जात आहेत. येताना पानाच्या डोम्यात (द्रोण) आणून आनंद घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
या फळामुळे घशाचे आजार होत नाहीत, असे जाणकार लोक सांगतात. त्याचा जो गोड रस असतो तो कफाचे पाणी करून शरिराला ताजेतवाने करतो, असे शेतकरी सांगतात. (वार्ताहर)