भाईंदर-दहिसर लिंक रोडमुळे कोंडीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:01 AM2019-01-17T01:01:33+5:302019-01-17T01:02:26+5:30

निविदा प्रक्रिया सुरू : एमएमआरडीएची मंजुरी, भाईंदर पालिका करणार काम

Bhaindar-Dahisar link road, rescued from Kandi | भाईंदर-दहिसर लिंक रोडमुळे कोंडीतून सुटका

भाईंदर-दहिसर लिंक रोडमुळे कोंडीतून सुटका

Next

भाईंदर : पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व्हाया मीरा रोड पश्चिम रेल्वेस्थानक ते दहिसर पश्चिम लिंक रोडच्या कामाला एमएमआरडीएने मान्यता दिल्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली आहे. हा लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील वाहतुकीतून सुटका होणार आहे.


रोडचे काम मीरा-भाईंदर महापालिकेकडून केले जाणार आहे. हा रस्ता भाईंदर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गाला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे जोडला जाणार आहे. तेथील राधास्वामी सत्संग व मिठागरापासून पुढे तो मीरा रोड रेल्वेस्थानकाकडे जाऊन दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथून पुढे जाणार आहे. या रोडचे अंतर पाच ते सहा किलोमीटर इतके असून त्याची रुंदी ४५ ते ६० मीटर इतकी असेल. त्यासाठी ३०० ते ३५० कोटींचा खर्च अंदाजित केला आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील, असा अंदाज आहे.


या रोडचे बांधकाम पूर्ण झाल्यास भाईंदर पूर्व व पश्चिमेकडील वाहतुकीला पर्याय उपलब्ध होऊन भाईंदर ते दहिसरदरम्यानचे मोठे अंतर कमी होणार आहे. मात्र, या नियोजित रोडच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात तिवरक्षेत्र असल्याने त्याच्या बांधकामात अडसर निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


भार्इंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते वसई येथे खाडीमार्गे जाणारा आणखी एक लिंक रोड प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित लिंक रोडला नियोजित भार्इंदर पश्चिम ते दहिसर पश्चिम लिंक रोड जोडला जाणार असल्याने वसई-विरार येथील वाहतुकीलाही मुंबईकडे जाण्यासाठी हा रोड पर्याय ठरू शकणार आहे. याखेरीज, भार्इंदर पश्चिम ते वसई किल्ल्यादरम्यान रो-रो सेवेच्या जेट्टीच्या कामाला सुरुवात केल्याने वसई-विरार ते मुंबईचे अंतर खूपच कमी होऊन मुंबई-अहमदाबाद महामार्गासह पश्चिम महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे.


पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका परिसरातील कोंडीतून कायमची सुटका होऊन ती जलद होणार आहे. नियोजित भाईंदर ते दहिसर लिंक रोडवर टोलबाबत निर्णय झालेले नाही. हा रोड सहा ते आठपदरी बांधण्यात येणार आहे.

Web Title: Bhaindar-Dahisar link road, rescued from Kandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.