अस्वच्छता कराल तर खबरदार! कल्याणमध्ये स्वच्छतारक्षक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 02:00 IST2019-08-17T01:59:11+5:302019-08-17T02:00:09+5:30
तुम्हाला रस्त्यात थुंकण्याची, कचरा फेकण्याची सवय असेल तर खबरदार; अन्यथा तुमच्या हाती दंडाची पावती पडून १०० ते ५०० रुपयांना खिशाला फटका बसेल.

अस्वच्छता कराल तर खबरदार! कल्याणमध्ये स्वच्छतारक्षक तैनात
कल्याण : तुम्हाला रस्त्यात थुंकण्याची, कचरा फेकण्याची सवय असेल तर खबरदार; अन्यथा तुमच्या हाती दंडाची पावती पडून १०० ते ५०० रुपयांना खिशाला फटका बसेल. कल्याण-डोंबिवली शहरांचा स्वच्छता गुणांक वाढवण्यासाठी महापालिकेने १०० कंत्राटी स्वच्छतारक्षक नेमले आहेत. अस्वच्छता करणाऱ्यांना शुक्रवारपासून कल्याणमधील ‘ब’ आणि ‘क’ दंडवसुलीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पाच हजार ८०० रुपये वसुली झाली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची शहरस्वच्छतेबाबत घसरगुंडी झाली आहे. शहराला गतवर्षीच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळाले; मात्र स्वच्छतेच्या बाबतीत शहर पहिल्या १० क्रमांकांत अव्वल राहावे, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधी व प्रशासनाने व्यक्त केली होती. डोेंबिवली हे सर्वाधिक अस्वच्छ शहर अशी टिप्पणी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहर स्वच्छतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शहरात कचरा कुंडीत न टाकता कचरा रस्त्यावर फेकला जातो. जागोजागी थुंकून रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ केली जातात. हा गलिच्छ व्यवहार रोखण्यासाठी महापालिकेने स्वच्छतारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली होती. महापालिका हद्दीत १० प्रभागक्षेत्रे असून या १० प्रभागक्षेत्रांत १२२ प्रभाग विभागले आहेत. प्रत्येक प्रभागात १० स्वच्छतारक्षक नेमण्यात आले आहेत. कल्याण शहरात ५० आणि डोंबिवली शहरासाठी ५० रक्षक नेमले आहेत. कल्याणमध्ये ओरियन सेक्युरिला, तर डोंबिवलीत सिंग सिक्युरिटी या कंपनीला कंत्राट दिले आहे. दोन वर्षांचे हे कंत्राट असून दंडाच्या एकूण वसुलीपैकी ६७ टक्के रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल, तर उर्वरित रक्कम कंत्राट कंपन्यांना मिळेल. कंत्राटदाराला मिळणाºया रकमेतून रक्षकांचे पगार देण्यात येणार आहेत.
कल्याण रेल्वेस्थानक परिसरात दंडवसुलीला सुरुवात होताच थुंकणाऱ्यांची भंबेरी उडाली. अनेकांना दंड आकारून त्याची पावती देण्यात आली. सायंकाळपर्यंत पाच हजार ८०० रुपये दंडवसुली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
किती आकारला जाणार दंड
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - १०० रुपये
उघड्यावर
लघुशंका करणे
- १०० रुपये
रस्त्यांवर घाण करणे
- १५० रुपये
उघड्यावर शौच करणे
- ५०० रुपये