सेनेशी गद्दारी कराल तर खबरदार
By Admin | Updated: April 1, 2017 05:45 IST2017-04-01T05:45:19+5:302017-04-01T05:45:19+5:30
मीरा-भार्इंदरमधील भाजपात आयारामांची संख्या सर्वाधिक असून शिवसेनेचा क्रमांक त्यापाठोपाठ लागतो

सेनेशी गद्दारी कराल तर खबरदार
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील भाजपात आयारामांची संख्या सर्वाधिक असून शिवसेनेचा क्रमांक त्यापाठोपाठ लागतो. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याची गद्दारी केल्यास त्यांना सेना स्टाइलने जागा दाखवू, असा इशारा शहर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकीत हा इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मीरा-भार्इंदर महापालिकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना पक्षांतराला काही दिवसांपासूनच सुरुवात झाली आहे. त्यात, सेनेतून भाजपाच्या वाटेवर असलेल्या दोन ते चार नगरसेवकांना उद्देशून सरनाईक यांनी सेनेतील सरसकट नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्याचा धसका त्या नगरसेवकांनी चांगलाच घेतला आहे. त्यांनी शिवसेनेतच राहण्याचा निर्णय जाहीरही करून टाकला.
पालिकेत सध्या सर्वात मोठा पक्ष भाजपा असून कमळाला पाणी घालण्यासाठी इतर पक्षांतील बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी आसुसलेले आहेत. अलीकडेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही दिग्गज व ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.
या वेळी सेनेतील दोन विद्यमान नगरसेवकही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी प्रभागरचनेनंतर पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. शिवसेनेचे सध्या १४ नगरसेवक असून मनसेचे एकमेव नगरसेवक अरविंद ठाकूर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेच्या नगरसेवकांची संख्या १५ झाली आहे. (प्रतिनिधी)
२२ एप्रिलला अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्याने पक्षांतराच्या तयारीत असलेले सेनेतील नगरसेवक भाजपात जाण्याची कुणकुण सरनाईक यांना लागली. त्यांनी हाटकेश येथील जनसंपर्क कार्यालयात दोन दिवसांपूर्वी सर्व नगरसेवकांची गोपनीय बैठक घेतली.
त्यात त्यांनी पक्ष सोडून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या त्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यामुळे ते नगरसेवक शांत होत इतर पक्षांतील नगरसेवकांना सेनेत आणण्यासाठी प्रयत्नशील झाल्याचे सांगण्यात येत आहे.
२२ एप्रिलला सेनेच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमात इतर पक्षांतील नगरसेवकांचा व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.