गणेशोत्सव मंडळांवर सवलतींची खैरात
By Admin | Updated: September 1, 2016 03:08 IST2016-09-01T03:08:40+5:302016-09-01T03:08:40+5:30
एकीकडे ठाणे महापालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करून तिचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सव मंडळांवर सवलतींची खैरात
ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करून तिचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लघंन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी आकारण्यात येणारी एक लाखाच्या दंडाची नोटीसही पालिकेने मागे घेतली आहे. असे असताना आता आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर डोळा ठेवून या गणेशोत्सव मंडळांमार्फत उभारण्यात येणारे मंडप, कमानी, बॅनर आदींसाठी पालिकेने ठरवलेले दरही तब्बल ८० टक्के कमी करण्याचा घाट बुधवारी झालेल्या महासभेत घातला गेला. सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांनीदेखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने गणेशोत्सव मंडळांना सवलतींची खैरात मिळाली आहे.
रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी किंबहुना इतर सर्वच उत्सवांसाठी महापालिकेने आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. तिचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना पालिकेने एक लाख रुपयाची नोटीस बजावली होती. सर्वपक्षीयांनी विरोध केल्याने अखेर ती नोटीस मागे घेतली. त्यानंतर, आता पुन्हा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेने सुरुवात केली. मात्र, आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय मंडळींनी गणेशोत्सव मंडळांमार्फत आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू केले आहे. मंडळांनी उभारलेले मंडप, कमानी, फलक आदींसाठी पालिकेने विविध स्वरूपांचे दर आकारले होते. ते भरणे मंडळांना शक्य नसल्याची भूमिका शिवसेनेचे नगरसेवक दशरथ पालांडे यांनी मांडली. त्याला इतर नगरसेवकांनीदेखील पाठिंबा दिला. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ज्या पद्धतीने दर कमी केले आहेत, त्याच धर्तीवर ते करावेत, अशी भूमिका इतर नगरसेवकांनी मांडली. हे दर गणेशोत्सवाच्या काळापुरते न ठेवता इतर सणांसाठीदेखील तसेच ठेवावे, असा ठराव मांडण्याची विनंती शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी केली. विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी तसा ठराव मांडला, तर सभागृह नेत्या अनिता गौरी यांनी अनुमोदन दिले. उत्सवासाठी मंडपउभारणी, फलक आणि कमानीसाठी महापालिकेने ठरवलेल्या दरात तब्बल ८० टक्के सवलत देण्याचा निर्णय या माध्यमातून घेण्यात आला.