नालेसफाईला सुरुवात
By Admin | Updated: May 7, 2017 05:56 IST2017-05-07T05:56:38+5:302017-05-07T05:56:38+5:30
शहरातील वालधुनी नदीपासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. नालेसफाई वर्षभर चालणार असून महापौर मीना आयलानी, उपमहापौर

नालेसफाईला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदीपासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. नालेसफाई वर्षभर चालणार असून महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत नालेसफाईला सुरुवात झाली. वालधुनी नदीच्या सफाईला आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे.
महापालिकेने वालधुनी नदीत जेसीबी मशीन उतरवून पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची सुरुवात केली.
वर्षातून तीन टप्प्यांत म्हणजे तब्बल ९० दिवस नालेसफाई होणार असून लहान नाल्याची सफाई कंत्राटी कामगाराकडून होणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी दिली. सकाळी ११ वाजता महापौर आयलानी, उपमहापौर इदनानी, आयुक्त सुधाकर शिंदे, केणे, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक गजानन शेळके, टोनी सिरवानी, शिवाजी रगडे आदी उपस्थितीत होते.
वालधुनी नदीला अतिक्रमणाचा विळखा पडल्याने नदीचे पात्र उथळ व अरुंद झाले. नदीच्या पुराचे पाणी दरवर्षी सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधीनगर, सीएचएम कॉलेज, हिराघाट, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, शांतीनगर परिसरात शिरते. यामुळे संसार उघड्यावर पडतो. नदीच्या दोन्ही बाजूंना उंच भिंत बांधण्याची मागणी माजी नगरसेविका सुमन शेळके, माजी नगरसेवक महादेव सोनावणे यांनी पालिकेकडे लावून धरल्यानंतर काही ठिकाणी तुकड्यांमध्ये संरक्षण भिंत
बांधली. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याने पुरात वाहून जातात की काय, अशी स्थिती संरक्षण भिंतीची झाली आहे.
वालधुनी नदीसह खेमाणी नाला, गायकवाडपाडा नाला, गुलशननगर नाला आदी नाल्यांसह अंतर्गत लहान नाल्यांची सफाई सलग ४५ दिवस सुरू राहणार आहे. नालेसफाईसाठी अडीच कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. नालेसफाईपूर्वीचे व नंतरचे फोटो कंत्राटदाराला बिलासोबत लावणे बंधनकारक आहे.