मैल्यामुळे राघोनगरमध्ये आरोग्याचा प्रश्न
By Admin | Updated: August 13, 2015 23:19 IST2015-08-13T23:19:41+5:302015-08-13T23:19:41+5:30
कल्याण (पू), प्रभाग क्र. ५५, मंगल राघोनगरमधील चाळींचे मैलायुक्त सांडपाणी बाजूच्या गटारात सोडल्यामुळे सफाई कामगारांना त्यात हात घालून स्वच्छता करावी लागते

मैल्यामुळे राघोनगरमध्ये आरोग्याचा प्रश्न
दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी
कल्याण (पू), प्रभाग क्र. ५५, मंगल राघोनगरमधील चाळींचे मैलायुक्त सांडपाणी बाजूच्या गटारात सोडल्यामुळे सफाई कामगारांना त्यात हात घालून स्वच्छता करावी लागते. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आनंद सदन, गंगुबाई अपार्टमेंट व अजिंक्यतारा सोसायटी इ. भागांत ही दुरवस्था आहे.
प्रभागात ९० टक्के चाळी व १० टक्के इमारती आहेत. गणेशनगर, मंगल राघोनगर, रघुनाथनगर, चिकणीपाडा हे प्रमुख निवासी विभाग आहेत. मागासवर्गीय ३५ टक्के, दक्षिण भारतीय १५ टक्के, उत्तर भारतीय १० टक्के, मुस्लिम २ टक्के, अन्य ३८ टक्के असे लोक या प्रभागात राहतात.
ज्या भागात मलवाहिन्या टाकण्यायोग्य परिस्थिती होती, तेथे मलवाहिन्या टाकण्यात आल्या. परंतु, अडचणीच्या ठिकाणामुळे मेमन कॉटेज, भोईर चाळ, वेणुबाई निवास येथे मलवाहिन्या टाकल्या नाहीत, असे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या प्रभागातील आरक्षण क्र. ४४९ व क्र. ४५१ या उद्यानासाठी असलेल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. मोकळ्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, म्हणून एके काळी प्रयत्न झाले. म्हणून, थोडीफार तरी मोकळी जागा राहिली आहे. ही जागा मनपाने ताब्यात घ्यावी, अशी जनतेची मागणी आहे.
या प्रभागात २ कूपनलिका असून त्यापैकी पिंकी अपार्टमेंट येथे असलेली कूपनलिका बंद आहे. २००९ साली मंजुरी घेतलेल्या जलकुंभाचे बांधकाम २०१२ साली पूर्ण झाले, तेव्हापासून अर्धे मंगल राघोनगर व पूर्ण गणेशनगरला ६ व ८ इंची जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गणेशनगर भागातील नागरिकांनी अधूनमधून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार आहे.
साई मंदिराच्या परिसरात भौगोलिकदृष्ट्या सखल भाग असून गटारे तुंबून अतिवृष्टीमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरते, असे तेथील लोकांनी सांगितले. पर्णकुटी रोड, चिकणीपाडा ते तिसगाव रोड, आझाद प्लंबरपर्यंत ६ फुटी रुंदीचा बंदिस्त नाल्याचे बांधकाम सुरु झाले. मात्र, पुढे तो अर्धवटच सोडून दिला आहे. गणेशनगर, आनंद सदन, समता सोसायटी, श्रीनाथ सोसायटी येथील चाळींमधील गटारे खुली असून त्यावर झाकणांची गरज आहे.
उत्कर्ष समितीच्या कार्यालयासमोर वाचनालय बांधले होते. मात्र, विरोधकांनी ते नष्ट केल्याची तक्रार वाचनप्रेमींनी केली. चंद्रपुष्प हा.सो.समोर जीवदानी मंदिराजवळ, काळू अपार्टमेंट बी विंगसमोर, तिसाई सर्व्हिस सेंटरसमोर चिखल, दलदल, अस्वच्छतेचे वातावरण होते. रीना को-आॅप. हा.सो.च्या बाजूला असलेला नाला अस्वच्छ होता. सद्गुरू एंटरप्रायजेससमोर प्रकल्पाचे काम होऊनसुद्धा ३ मोठे पाइप पडून आहेत. विकास आराखड्यानुसार या प्रभागात एकही नवा रस्ता नाही. मात्र, कलम २१० अन्वये रस्ते बांधले आहेत. खाजगी सोसायट्यांमध्ये पेव्हरब्लॉक भरपूर टाकण्यात आले आहेत.