वीज जाेडणी ताेडणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST2021-03-23T04:43:08+5:302021-03-23T04:43:08+5:30
अंबरनाथ : महावितरण कंपनीने वीज बिल थकवणाऱ्यांची वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांची हजारो रुपयांची बिले ...

वीज जाेडणी ताेडणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण
अंबरनाथ : महावितरण कंपनीने वीज बिल थकवणाऱ्यांची वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांची हजारो रुपयांची बिले थकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. मात्र, जोडणी खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलीस आणि त्याच्या मुलाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथच्या राहुल इस्टेट परिसरात राहणाऱ्या आनंद लोखंडे यांचे पाच महिन्यांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे महावितरणच्या आदेशानुसार कर्मचारी रूपेश जाधव यांनी शनिवारी त्यांची वीज जोडणी कापली. मात्र, काही वेळातच लोखंडे यांनी बिल भरले. त्यामुळे महावितरणने त्यांच्या टेक्निशियनला लोखंडेची वीज जोडणी पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. रूपेश जाधव हे रॉयल पार्क परिसरात काम करत असल्याने त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला लोखंडे यांच्याकडे पाठवले. तेव्हा ज्यांनी वीज जाेडणी कापली त्यांनाच बोलवा, असा आग्रह लोखंडेने धरला. त्यानंतर जाधव यांना कॉल करून ते कुठे आहेत, याची माहिती घेतली आणि लोखंडे हे त्यांच्या परिवारासह रॉयल पार्क परिसरात आले. तेथे जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण केली. लोखंडेच्या मुलानेही त्यांना मारहाण केली. या मारहाणीत जाधव यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाधव यांनी दिलेल्या तक्रार केली. त्यावरून लाेखंडे यांचा मुलगा अमन लाेखंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
रेल्वे पाेलिसाला अभय का?
मारहाणीत आनंद लाेखंडे यांनी आपल्या मुलासाेबत मारहाण केली. त्याविषयी जाधव यांनी तक्रारीत आराेप करूनही आनंद लोखंडेचे नाव गुन्ह्यातून काढून टाकले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कामगाराला मारहाण करून कामात अडथळा आणणाऱ्या रेल्वे पोलिसाला शिवाजीनगर पोलीस अभय का देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---------