ठाणे : ठाण्याचा दाढीवाला आणि हैदराबादचा दाढीवाला हे फडणवीसांचे सहकारी आहेत. मतदारांमध्ये जातीय तेढ निर्माण करून मत मागणारे आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आताचे सरकार हे मायबाप सरकार नसून तमासगीर झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचा आज ठाण्यात निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी सपकाळ यांनी शिंदेंवर टीका केली. ठाण्यात निवडणुकीत काँग्रेसला मिळणारे यश हे आश्चर्यजनक असेल, असा दावा केला. सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रभर तू मारायचे सोंग कर, मी रडायचे सोंग करतो या बनवाबनवीचा शेवट होत आहे. मित्रपक्षांनी सत्तेतून बाहेर येऊन टीका करावी.
महाराष्ट्रात आता खपवले जाणार नाही
सपकाळ म्हणाले की, फडणवीस हे देवाभाऊ नसून ते टक्का भाऊ, घेवा भाऊ, मेवा भाऊ आहेत. 'बेटी पढाओ, बेटी बचाओ'पासून आता 'भाजपपासून बेटी बचाओ' म्हणण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पैसा कमी पडत असल्याने त्यांच्या परिवारातील सदस्य हे ड्रग्जची फॅक्टरी चालवत होते का, असा सवाल सपकाळ यांनी केला. तसेच अंबरनाथमध्ये घडलेले प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.