सावधान! जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:14+5:302021-05-27T04:42:14+5:30

ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागल्याने जिल्हा आरोग्ययंत्रणा अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली ...

Be careful! The number of patients with mucomycosis increased in the district | सावधान! जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले

सावधान! जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले

ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागल्याने जिल्हा आरोग्ययंत्रणा अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या आजाराचे ११७ रुग्ण आढळले असून, त्यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्ययंत्रणेने दिला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले; परंतु ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर योग्य ते उपचार घेणे हाच यावरील मार्ग आहे. जिल्ह्यातील तीन रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविले आहे, तर बहुसंख्य रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

यामध्ये सर्वाधिक ४० रुग्ण हे ठाणे महापालिका हद्दीत आढळून आले आहेत, तर त्याखालोखाल नवी मुंबईत ३४, कल्याणमध्ये २९, उल्हासनगर ३, भिवंडी १, मीरा भाईंदर ८, अंबरनाथ १, बदलापूर १, अशी या रुग्णांची संख्या आहे. सुदैवाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराचा रुग्ण अद्यापही आढळलेला नाही, तर रोजच्या रोज जिल्ह्यात सरासरी ११ च्या आसपास नवे रुग्ण या आजाराचे सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर या आजारामुळे ठाण्यात एक, नवी मुंबईत पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून, कल्याणमध्ये तीन आणि उल्हासनगरमधील एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

औषधांचा मुबलक साठा

शासकीय रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू असतील तर रुग्णाला मोफत औषधोपचार केले जात आहेत. त्यासाठी लागणारा औषधींचा साठा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पुरेसा असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.

.................

जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ॲनेस्थेशिया, कान, नाक, घसा तज्ज्ञ आदींची ७ जणांची टीम सज्ज आहे, तसेच चार ते पाच दंतचिकित्सकदेखील उपलब्ध आहेत, तर बाहेरूनदेखील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेतली जाणार असून, न्यूरो सर्जनही उपलब्ध केले जाणार आहेत.

(कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)

Web Title: Be careful! The number of patients with mucomycosis increased in the district