इम्युनिटी वाढीसाठी तुळस, गवती चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:47 IST2021-05-07T23:46:44+5:302021-05-07T23:47:05+5:30
औषधी गुणधर्म असलेल्या रोपांची लागवड : गुणकारी वनस्पतींना नागरिकांची पसंती

इम्युनिटी वाढीसाठी तुळस, गवती चहा
अनिरुद्ध पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : कोविड संसर्गाचा धोका वाढत आहे. नागरिकांचा शारीरिक व मानसिक तोल डळमळीत झाला आहे. त्यामुळे आजारपणाची जाणीवही मनाला चटका लावून जाणारी आहे. शिवाय, उन्हाळा आग ओकत असताना उलटी, ताप, तसेच नैराश्याची भावना वाढते आहे. या सर्वांवर औषधी वनस्पतींचा वापर गुणकारी ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या लागवडीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
कोरोना आजाराची बरीच लक्षणे सांगितली जातात. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, उलटी ही लक्षणे ऋतू बदलाच्या काळातही दिसून येतात. सध्या शहारांप्रमाणेच ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक व्याधींनीही ग्रासले आहे. आजीबाईच्या बटव्यात लहानसहान आजारांवर औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींच्या पाने, फुले, फळे, साली आणि खोडांच्या भागांपासून आरामदायी रामबाण उपाय आहेत.
गुगलवर सर्च केल्यावर कोणत्या वनस्पतींपासून कशा प्रकारचा फायदा होतो, याविषयी माहिती सहज उपलब्ध आहे. संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी निर्बंध लागू असून, शाळांना सुटी, तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे गरज व विरंगुळा म्हणून औषधी गुणधर्मयुक्त वनस्पतींच्या लागवडीकडे लोकांचा ओढा वाढला आहे.
या पाच राेपांची वाढली मागणी
कोरफड : थंड प्रकृती, वेदनाशामक, पोट, त्वचा, केस यासाठी ही वनस्पती उपयोगी ठरते. तसेच काेरफडीमुळे पाेटाचे विकार दूर हाेत असल्यामुळे तिचे आयुर्वेदात माेठे महत्त्व आहे. सध्या या वनस्पतीला मागणी वाढल्याचे दिसत आहे.
गुळवेल : तापनाशक, प्लेटलेट्स वाढविते, राेग प्रतिकारशक्ती वाढविते. सध्या काेराेनाच्या काळात राेग प्रतिकारशक्तीला महत्त्व आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून या वनस्पीला घरात स्थान दिले जात असल्यामुळे मागणी वाढली आहे.
गवती चहा : थंड प्रकृती असून, तापशामक आहे. तसेच भूक वाढविते. सध्या कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही हाेत असून, त्यापासून संरक्षण करण्यात गवती चहाचा चांगला उपयाेग हाेत असल्याने नागरिक या वनस्पतीकडे वळत आहेत.
अडुळसा : कफ, दमा, अस्थमा, पोटातील जंत यावर प्रभावी औषध. काेराेनाकाळात कफ, दमा यांसारख्या आजारांमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अडुळसा घराजवळ असावा म्हणून याची राेपे नागरिक खरेदी करतात.
पुदिना : कफ, दमा, तोंडाला चव येण्यासाठी, भूक वाढविणे आदी वात उपयोगी. काेराेनामुळे ताेंडाला चव लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुदिनामुळे ताेंडाची चव टिकविण्यात मदत हाेत आहे. तसेच कफ आणि दम्यासंबंधी आजारावरही आराम मिळत आहे.
तुळस, गवतीचहा, शतावरी, पुदिना अशा विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींबद्दल समाजात जागरूकता निर्माण झाली आहे. शिवाय या रोपांच्या किमती स्वस्त आणि फायदे अधिक असल्याने मागणी असते.
- विनीत राऊत
नर्सरी मालक, बोरिगाव
काळाची गरज म्हणून औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. ग्रामीण भागात परसबागेत, तर शहरात कुंडीत ही रोपे सहज लावता येतात.
- स्नेहल पाटील
गृहिणी