...तर पाण्यासाठी जमावबंदी?

By Admin | Updated: March 29, 2016 03:27 IST2016-03-29T03:27:41+5:302016-03-29T03:27:41+5:30

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा

... the ban on water? | ...तर पाण्यासाठी जमावबंदी?

...तर पाण्यासाठी जमावबंदी?

- सुरेश लोखंडे,  ठाणे

उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील तीन महिने पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक शहरांत ६५ टक्क्यांपर्यंत पाणीकपात लागू आहे. त्यामध्ये आणखी वाढ केली तर जनक्षोभ उसळेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे लातूरप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पाण्याकरिता जमावबंदी लागू केल्यास नवल वाटणार नाही, अशी शक्यता उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.
ठाणे शहरासह मुंबई शहर व उपनगरांस पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, या धरणातील पाण्यावर ठाण्यापेक्षा मुंबईच अधिक हक्क सांगत आली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात केवळ ३६ टक्के पाणी शिल्लक असून उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात फक्त २२.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बारवी धरणाची स्थिती चिंताजनक आहेच, पण त्याहूनही गंभीर परिस्थिती उल्हास नदीची आहे. येथील पाणीसाठा आणखी कमी झाल्यावर बारवी धरणातील साठ्यावर अवलंबून राहावे लागेल. उद्योगांचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल. मात्र, सध्या लागू केलेली ६५ टक्के पाणीकपात आणखी वाढवली तर जनक्षोभ उसळेल, अशी स्थिती आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पंधरवड्यात तशी परिस्थिती निर्माण झाली तर अतिरिक्त पाणीकपात लागू करतानाच पाण्याकरिता जमावबंदीचे लातूरमध्ये लागू केले, तसे आदेश ठाणे जिल्ह्यात लागू करावे लागतील.

धरणांमधील एकूण पाणीसाठा
७१.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा मागील वर्षी आजच्या तारखेला बारवी धरणात होता.
६५.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा आहे
१३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात मागील वर्षी आजच्या तारखेला होता.
७६.९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आज आहे.

Web Title: ... the ban on water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.