बाजार समित्यांच्या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच बळीराजा आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:53 AM2021-01-13T02:53:31+5:302021-01-13T02:53:51+5:30

सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन

Baliraja is self-sufficient only if he is freed from the slaughterhouses of the market committees | बाजार समित्यांच्या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच बळीराजा आत्मनिर्भर

बाजार समित्यांच्या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच बळीराजा आत्मनिर्भर

Next

ठाणे : पूर्वी राजेशाहीतील लूट समजून यायची; पण लोकशाहीत ‘खळं’ लुटले जात असतानाही आम्हाला उमगले नाही. शेतकऱ्याला लुटणारा ‘गब्बर’ कळलाच नाही. बाजार समित्यांच्या या कत्तलखान्यातून मुक्त झाला तरच ‘बळीराजा’ खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते आ. सदाभाऊ खोत यांनी केले. सरस्वती सेंकडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘आत्मनिर्भर बळीराजा’ हे चौथे पुष्प सोमवारी खोत यांनी गुंफले. यावेळी आ. संजय केळकर यांनी प्रास्ताविक केले. 

केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार असताना गेले काही दिवस दिल्लीच्या तख्तावर आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी आपली भूमिका विशद केली. हमीभावाने खरेदीची लेखी हमी सरकार देण्यास तयार असतानाही शेतकरी संपेल, अशी अनाठायी भीती दाखवून सुरू असलेल्या पंचतारांकित आंदोलनाला आता राजकीय वास येत आहे. कायदेच रद्द करा, असे म्हणणे झुंडशाहीचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर नंतरच्या राजेशाहीत बळीराजाची लूटच होत होती, ती समजून यायची. शोले चित्रपटातील ‘गब्बर’ गावात दवंडी पिटून लुटायचा. मात्र, लोकशाहीत लुटणारे हे ‘गब्बर’ आपल्याला कळलेच नाहीत.

राजकारण्यांनी या लुटीची व्यवस्थाच करून ठेवली आहे, आधी शेतकऱ्याच्या शेतमालावर लेव्ही लावली, नंतर झोनबंदी, तालुका, जिल्हा, प्रांत, राज्यबंदी आणि निर्यातबंदी केली. हे कमी म्हणून परदेशातून स्वस्त माल आयात करून इथले उत्पादन मातीमोल केले. त्यावर बाजार समित्या नेमून नात्यागोत्यांना खरेदी-विक्रीचे परवाने देऊन सेस लावला. खरेदीदार तेच, व्यापारी तेच, अडते आणि दलालही तेच. यांच्यावर राजकारण्यांची माणसे संचालकपदी नेमून बळीराजाची पिळवणूक केली जाते. खरेदी केलेला माल गोदामात सडवून शेकडो कोटींचे घोटाळे करायचे. बाजार समित्या म्हणजे कत्तलखाने असून या कत्तलखान्यातून शेतकरी मुक्त झाला तरच आत्मनिर्भर बनेल, असा दावा त्यांनी केला.
 

Web Title: Baliraja is self-sufficient only if he is freed from the slaughterhouses of the market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.