सर्जनमुळे ढासळले मनोरुग्णालयाचे संतुलन
By Admin | Updated: April 20, 2017 04:13 IST2017-04-20T04:13:23+5:302017-04-20T04:13:23+5:30
मनोरुग्णांच्या भावभावना समजून घेण्याकरिता मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी मनोविकारतज्ज्ञ असावा

सर्जनमुळे ढासळले मनोरुग्णालयाचे संतुलन
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
मनोरुग्णांच्या भावभावना समजून घेण्याकरिता मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी मनोविकारतज्ज्ञ असावा, हा महत्त्वाचा निकष पायदळी तुडवत जनरल सर्जन असलेल्या डॉ. दिनकर रावखंडे यांची ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याने सध्या मनोरुग्णालयात सावळागोंधळ आहे.
पुण्यापाठोपाठ ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय सर्वात मोठे आहे. अलिबाग, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, पालघर, रायगड, नंदुरबार हे आठ जिल्हे या रुग्णालयाशी जोडले गेले आहेत. या भागातील मनोरुग्ण या ठिकाणी दाखल केले जातात. सध्याच्या या रुग्णालयात दीड हजाराहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या सात वर्षांपासून ठाण्यातील अधीक्षकांचे पद रिक्त होते. या कालावधीत या पदावर प्रभारी नियुक्त केले जात होते. अधीक्षकपदावर मनोविकारतज्ज्ञ असावा, असा नियम असतानाही तो डावलून जनरल सर्जन असणाऱ्या डॉ. रावखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रावखंडे यांनी यापूर्वी पुण्यात सहायक संचालक वैद्यकीय हे पद भूषवले होते. त्याआधी साडेतीन वर्षे ते सोलापूरमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत होते. मनोविकारतज्ज्ञास मनोरुग्णांच्या मानसिक आजारांची, त्यांच्या औषधोपचारांची माहिती असते. मनोरुग्णांना हाताळणे, हे वैद्यकीय क्षेत्रातील स्पेशलायझेशन आहे. इस्पितळात उपचाराकरिता आणलेल्या मनोरुग्णांपैकी कोणाला दाखल करून घ्यायचे, कोणाला नाही, याचे अनुमान तेच काढू शकतात. मनोविकारतज्ज्ञ आणि मनोरुग्णांत संवाद आवश्यक असतो. रुग्णाच्या मनात सुरू असलेली खळबळ जनरल सर्जनला कशी समजू शकणार? त्यामुळे ते हे पद कसे भूषवू शकतील, हा प्रश्न आहे. इतके सारे प्रश्न अनुत्तरीत असतानाही सध्या मनोरुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची जबाबदारी डॉ. रावखंडे हेच पार पाडतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. समजा, एखाद्या रुग्णाबाबत डॉ. रावखंडे यांचे निदान चुकले, तर मनोरुग्ण नसलेली व्यक्ती दीर्घकाळ रुग्णालयात खितपत पडण्याचा धोका आहे.