बदलापूर: बदलापूर येथील रितू वर्ल्ड या गृहसंकुलातील सी विंगमध्ये सातव्या मजल्यावर एा व्यक्तीने घराचे दार बंद करून आत्महत्या केली. आत्महत्या करत असताना घरातील बेडरूममध्ये तीन कुत्र्यांना सोबत घेऊन त्याने स्वतःला पेटवले. त्यामुळे त्या व्यक्तीसह घरातील तीन कुत्रेदेखील मृतावस्थेत सापडले आहेत. या आत्महत्येमागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव सत्यप्रित चॅटर्जी असून ही व्यक्ती रितू वर्ल्ड इमारतीत भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत होती. शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस चॅटर्जी यांनी आपल्या घरातील बेडरूमला कडी लावत आणि त्या दरवाजाच्या समोर लोखंडी कपाट ठेवून स्वतःला पेटवून घेतले. त्यावेळी बेडरूममध्ये तीन पाळीव कुत्रेदेखील होते. आग भीषण असल्याने त्या आगीत चॅटर्जी आणि त्यांचे तिन्ही कुत्रे पूर्णपणे आगीत होरपळले. या आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घराचे दरवाजे तोडून आग विझवली आग पूर्ण आटोक्यात आल्यानंतर पाहणी केली असता चॅटर्जी आणि त्यांच्यासोबत तीन कुत्र्यांचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.