मुंबई - बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलिस वाहनाच्या चालकासह पाच पोलिस जबाबदार असल्याचे दंडाधिकारी चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला दिले.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. ठाणे क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, मुख्य हवालदार अभिजित मोरे, हवालदार हरीश तावडे आणि पोलिस वाहनाचा चालक अशा पाच जणांच्या पथकावर दंडाधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे.
पोलिसांनी बनावट चकमकीत आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेद्वारे केला आहे. याच्या तपासासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणीही त्यांनी न्यायालयात केली होती. त्यावर, दंडाधिकारी चौकशी सुरू असल्याचे सरकारने न्यायालयाला सुरुवातीच्या सुनावणीत सांगितले होते.
दंडाधिकाऱ्यांचा अहवाल सोमवारी सादर करण्यात आला. तो वाचल्यानंतर न्यायालयाने, पोलिसांकडून बळाचा वापर होणे न्याय्य नाही. पोलिस परिस्थिती सहजपणे हाताळू शकले असते, अशी टिप्पणी केली. त्यावर, राज्य सरकार कायद्यानुसार कारवाई करेल आणि गुन्हाही दाखल करेल, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस; वडिलांनी घेतले होते अडीच लाखांचे कर्जबदलापूर (जि. ठाणे) : अक्षय शिंदे याच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खासगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही जप्तीची नोटीस लावली आहे.अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खासगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अन्यत्र राहण्यासाठी गेले. त्यांच्या कर्जाचे हप्ते थकले. त्यामुळेच आता या बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे. दरम्यान, अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट होता. तत्कालीन सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून महाराष्ट्रात करायची होती, असा आरोप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करणार तपास दंडाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, पिस्तुलावर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, तर फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालानुसार, आरोपीच्या वडिलांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. भविष्यात प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
पाच पोलिस आरोपीच्या हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष दंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात काढला आहे, असे नमूद करीत खंडपीठाने पुढील तपास कोणती तपास यंत्रणा करणार? असा प्रश्न मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना केला. त्यावर, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करेल, अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांच्या अहवालाची मूळ प्रत स्वत:कडे ठेवली. या प्रकरणाची सुनावणी आता ५ फेब्रुवारीला होईल.
पोसलेल्या भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न नागपूर : बदलापूर अत्याचाराची घटना राज्याला काळिमा फासणारी होती. सरकारने पोसलेल्या भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.