बदलापुरात तीन महिन्यांत ४०१ लहान मुले बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:09+5:302021-04-03T04:37:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोनाबाधित आढळत आहेत. अशातच ...

बदलापुरात तीन महिन्यांत ४०१ लहान मुले बाधित
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोनाबाधित आढळत आहेत. अशातच ही नवी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे समस्त पालकवर्गाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ आणि बदलापुरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जात आहेत. कारण, या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणेही दिसून येत आहेत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्या ही या नव्या कोरोनाची नवी लक्षणे आहेत. हीच लक्षणे लहान मुलांसाठी घातक ठरत आहेत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती. मात्र, लहान मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा जास्त असल्याने मुले लवकर बरी होत होती. मात्र, नव्या कोरोनामध्ये होत असलेले जुलाब, उलट्या हे त्रास लहान मुलांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांची संख्या पाहता बदलापूर शहरात मागील तीन महिन्यांत ४०१ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शून्य ते ५ वयोगटातील ८८, ६ ते १० वयोगटातील ९६, ११ ते १५ वयोगटातील ११३, तर १६ ते २० वयोगटातील १०४ लहान मुलांचा समावेश आहे. तर अंबरनाथमध्येही मागील दोन महिन्यांत २१५ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ० ते ५ वयोगटातील २२, ६ ते १० वयोगटातील ४४, ११ ते १५ वयोगटातील ६२, १६ ते २० वयोगटातील ८७ लहान मुलांचा समावेश आहे. या नव्या संख्येमुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार असली, तरी मुलांची काळजी घेणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय असल्याचेही डॉक्टर सांगत आहेत.
--------------------