नामांकित कंपन्यांच्या गोण्यांत निकृष्ट सिमेंट
By Admin | Updated: January 24, 2017 05:49 IST2017-01-24T05:49:43+5:302017-01-24T05:49:43+5:30
सिमेंटची वाहतूक करताना रेल्वेच्या डब्यांमध्ये पडणारे निकृष्ट दर्जाचे सिमेंट मातीमोल भावात विकत घेऊन ते नामांकित कंपन्यांच्या

नामांकित कंपन्यांच्या गोण्यांत निकृष्ट सिमेंट
ठाणे : सिमेंटची वाहतूक करताना रेल्वेच्या डब्यांमध्ये पडणारे निकृष्ट दर्जाचे सिमेंट मातीमोल भावात विकत घेऊन ते नामांकित कंपन्यांच्या नावे विकणाऱ्या एका टोळीचा ठाणे पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील पाच आरोपींना अटक करण्यात आली
आहे.
मालगाडीने सिमेंटची वाहतूक करताना डब्यांमध्ये सिमेंट जमा होते. याशिवाय, रेल्वेच्या गोदामांमध्ये सिमेंटच्या गोण्या उतरवताना प्लॅटफॉर्मवरही सिमेंट पडते. ते निकृष्ट दर्जाचे असल्याने रेल्वे प्रशासन मातीमोल भावात विकते.
रेल्वेकडून विकत घेतलेले हे सिमेंट नामांकित कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरून ते बांधकाम व्यावसायिकांना विकण्याचा गोरखधंदा बाळकुम परिसरातील एका गोदामात सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी करून गोदामावर धाड टाकली.
आरोपींचा हा गोरखधंदा एका भाड्याच्या गोदामात सुरू होता. बाळकुम परिसरातील हे गोदाम राजेश भोईर यांच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपींविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)