कर्करोगाविरोधात प्रबोधनपर जागृती
By Admin | Updated: March 7, 2015 22:25 IST2015-03-07T22:25:32+5:302015-03-07T22:25:32+5:30
महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञान आणि दुर्लक्षितपणामुळे अनेक स्त्रिया यामध्ये दगावतात.

कर्करोगाविरोधात प्रबोधनपर जागृती
प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञान आणि दुर्लक्षितपणामुळे अनेक स्त्रिया यामध्ये दगावतात. रोग झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्यापेक्षा त्या अगोदरच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेतल्यास प्रश्न सुटू शकतो. यासाठी वर्षा कदम यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह पुढाकार घेतला आहे. आणि ग्रामीण महिलांकरिता कर्करोगाबाबत जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यांपासून या सावित्रीच्या लेकी गावागावांतून आजार निपटून काढण्यासाठी सरसावल्या आहेत.
शहरातील सुमारे ३० टक्के महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. याबरोबर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. एका वैद्यकीय पाहणीनुसार स्तनाचा कर्करोग झालेल्या दहापैकी पाच महिलांचा मृत्यू होतो. याचा अर्थ स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीचे प्रमाण फारच कमी आहे.
नवीन पनवेल येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला रुग्णांबाबत विशेष काम करणाऱ्या वर्षा राजेश कदम यांनी पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाबाबत माहिती देऊन त्यांच्यात जागृती करण्याचा संकल्प त्यांनी सोडला, त्यानुसार त्यांनी याविषयी अभ्यास तर केलाच, त्याचबरोबर या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी घेऊन मार्गदर्शन घेतले.
जव्हार येथील जांभुळवाडी, वाकडी आणि धरणा कॅम्प येथे महिलांना एकत्रित करीत आहेत. यावेळी स्त्रियांना कर्करोग होऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी, स्वत:चे निरीक्षण कसे करायचे, याशिवाय कर्करोगाचे लक्षणे यावर जागृती करण्यात आली. रोगप्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी माहिती या शिबिरात देण्यात येत आहे. वर्षातार्इंनी याकरिता खास चित्रफीत तयार केली आहे. ती फीत दाखवून भगिनींचे प्रश्न, भीती, शंका या गोष्टींचे पूर्णत: निरसन करण्यात येते.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी बहुल अनेक गावे आहेत. त्या ठिकाणी आरोग्याविषयी फारशी जागरूकता नसल्याने अशा गावात आरोग्यदूत म्हणून या सावित्रीच्या लेकीने काम करीत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त हार-तुरे किंवा एखादा कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी महिलांना उपयोगी ठरेल, असे उपक्र म हाती घेणे आवश्यक असल्याचे कदम सांगतात.
कर्करोगाबाबत ग्रामीण भागातील महिलांना काहीच माहिती नसते. हा आजार अतिशय भयानक असला तरी योग्य वेळी माहिती पडल्यास तो बरा होऊ शकतो. अनेकदा महिला हा विकार लपवून ठेवतात, असे म्हणण्यापेक्षा त्यांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे मी महिलांसाठी कर्करोग प्रबोधनाचा उपक्र म हाती घेतला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- वर्षा कदम,
सामाजिक कार्यकर्त्या