लेखकात विद्रोहाचे धाडस असावे
By Admin | Updated: December 27, 2016 02:47 IST2016-12-27T02:47:02+5:302016-12-27T02:47:02+5:30
अनुभव चोरता येतात, मात्र अनुभूती चोरता येत नाही, असे सांगत लेखकाच्या अंगी विद्रोहाचे धाडसही हवे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे

लेखकात विद्रोहाचे धाडस असावे
बदलापूर : अनुभव चोरता येतात, मात्र अनुभूती चोरता येत नाही, असे सांगत लेखकाच्या अंगी विद्रोहाचे धाडसही हवे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बदलापूर येथील ‘विचारयात्रा साहित्य संमेलना’त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, आगरी युथ फोरम, ग्रंथसखा वाचनालय, सुहृद एक कलांगण आणि आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बदलापुरातील काटदरे सभागृहात नानासाहेब चापेकर साहित्यनगरीमध्ये हे संमेलन आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या उपस्थितीत, आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना काळे यांनी साहित्यिक आणि लेखकाच्या अंगी असलेल्या गुणांबाबत आपले विचार मांडले.
साहित्यिकांचे व्यक्तिमत्त्व हे वैश्विक पातळीवर विचार करणारे असावे, तसेच जगण्याच्या पातळीवर व्यक्तीला संपन्न करण्याची ताकद त्याच्या अंगी असावी, असे विचार त्यांनी मांडले. गेल्या अनेक वर्षांत वेगवेगळ्या धाटणीचे साहित्यिक एकाच काळात पाहायला मिळाले. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या काळातही पंडित कवींसारखे लेखक होतेच. तसेच कल्पनाविश्वातील ना.सी. फडके असतानाही मर्ढेकरांसारख्या कवींनी अस्पर्श भागाला हात घातला होता. विश्वसाहित्यात मराठीचे स्थान आहे का, हा वि.स. खांडेकर यांचा त्या वेळचा प्रश्नही महत्त्वाचा होता. लेखकाची जीवनदृष्टी ही त्याच्या कृतीतून आणि विचारातून दिसत असते. त्यामुळे जीवनार्थाचे प्रकटीकरण लेखकांच्या हातून व्हावे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
मराठी भाषेवर अतिक्र मण वाढत आहे. ते रोखण्यासाठी तरु ण पिढीला मराठीचे आकर्षण वाटले पाहिजे, यासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. (प्रतिनिधी)
- बदलापूर हे बदलाचा स्वीकार करणारे शहर असून त्याला साहित्य संस्कृतीचे वलय आहे. या शहरात या क्षेत्रातील रसिक व अभ्यासक वाढत असल्याने यापुढील साहित्य संमेलन हे बदलापूरमध्ये घेण्याचे आग्रही निमंत्रण या वेळी किसन कथोरे यांनी केले.
- मराठी भाषा जगवण्यासाठी मराठी शाळा जगल्या पाहिजेत आणि त्यासाठी शिक्षक जगवणे गरजेचे असल्याचे मत स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी वेळी व्यक्त केले.