लूटमार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे ऑडिट करून दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:08+5:302021-04-30T04:51:08+5:30
ठाणे : कोविडबाधितांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. काही खाजगी ...

लूटमार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे ऑडिट करून दोषींवर कारवाई करा
ठाणे : कोविडबाधितांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. काही खाजगी रुग्णालये अत्यंत चांगले काम करून रुग्णांना सेवा देत असली तरी काही रुग्णालये मेडिकल, पॅथॉलॉजीच्या नावाखाली भरमसाट बिले आकारत असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत. अशा रुग्णालयांची चौकशी करून त्यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर होणारी कारवाई ही गंभीर स्वरूपाची असेल, असे सूचित करणारे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहे.
वास्ताविक पाहता, शासनाने बिले आकारण्याबाबत दरपत्रक ठरवून दिले आहे व याची माहिती संबंधित रुग्णालयांनी दिलेली आहे. असे असतानादेखील शासनाच्या नियमास बगल देऊन काही रुग्णालये भरमसाट बिले आकारत आहेत. त्यांचे संपूर्ण ऑडिट करून यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा प्रकारे कारवाई झाल्यास संबंधित रुग्णालयांना भविष्यातही त्याचा त्रास होईल याची नोंद खाजगी रुग्णालयांनी घ्यावी, असेही महापौरांनी बजावले आहे.
मागील एक वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नागरिकांचा नोकरी-व्यवसाय अडचणीत आला आहे. आजही कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असला तरी आर्थिक विवंचनेत असलेले नागरिक खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाण्यास धजावत नाहीत. परिणामी, त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. महामारीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार घेता यावेत या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयांना मंजुरी दिली आहे. परंतु, जर ही रुग्णालये नागरिकांची लूट करीत असतील तर हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असे महापौरांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.