ठाण्यातील सराफाच्या दुकानावर बंदुकीच्या धाकावर दरोड्याचा प्रयत्न; एकाला नागरिकांनी पकडले, तिघे पळाले
By जितेंद्र कालेकर | Updated: August 14, 2024 14:55 IST2024-08-14T14:53:28+5:302024-08-14T14:55:57+5:30
हा धक्कादायक प्रकार घडला असताना, दुकानदाराने धैर्याने प्रसंगावधान दाखवले आणि पोलिसांना तत्काळ माहिती दिली.

ठाण्यातील सराफाच्या दुकानावर बंदुकीच्या धाकावर दरोड्याचा प्रयत्न; एकाला नागरिकांनी पकडले, तिघे पळाले
ठाणे :ठाणे शहरातील बाळकूम नाक्यावर दोन मोटारसायकलीवरून आलेल्या चार सशस्त्र दरोडेखोरांनी . एका सराफाच्या दुकानावर बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार घडला असताना, दुकानदाराने धैर्याने प्रसंगावधान दाखवले आणि पोलिसांना तत्काळ माहिती दिली. घटनास्थळी वेगाने दाखल झालेल्या ठाणे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, मात्र उर्वरित तिघेही आरोपी पसार झाल्याची माहिती कापुरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली.
दरोडेखोरांनी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास दुकानात शिरताच बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदाराच्या तत्परतेमुळे त्यांचा हा डाव फसला. पकडलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्याच्या सहाय्याने उर्वरित फरार आरोपींचा माग काढला जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींचे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या टोळीवर इतरही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे.
ठाणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या घटनेनंतर बाळकूम नाक्यावरील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी स्थानिक व्यापारी संघटनांना विश्वासात घेत सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा केली आहे.
या घटनेच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुकानांमध्ये सुरक्षा कॅमेरे आणि अन्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत असून, ठाणे शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
पोलिसांच्या जलद कारवाईमुळे एक आरोपी ताब्यात घेतला गेल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असला आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.