ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, एक कर्मचारी जखमी
By अजित मांडके | Updated: October 10, 2023 23:25 IST2023-10-10T23:25:34+5:302023-10-10T23:25:45+5:30
दगडफेक करून दोन वाहनांचे नुकसान

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, एक कर्मचारी जखमी
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फेरीवाल्यांकडू अतिक्रमण विभागाच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर पालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे.
वागळे इस्टेट परिसरातील रोड नं १६ या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहने निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या गाडीवर दगड मारण्यात आला. यामध्ये या गाडीची काच फुटली. प्रसंगावधान राखत गाडीच्या चालकाने गाडी सोडून त्या ठिकाणाहुन पळ काढला. तर फेरीवाल्यांकडून आणखी एका वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंर उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांनी पालिकेच्या या कारवाईचा विरोध केला असून कोणत्या तरी महिलेने काढलेल्या व्हिडीओच्या आधारे पालिकेने ही कारवाई केली असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आला आहे. पालिका जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा आम्ही या ठिकाणी बसत नाही. आमच्याकडून पावत्याही फाडल्या जातात. पालिकेचे कोणत्याही प्रकारची सूचना न देता ही कारवाई करण्यात आली असल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.