केळवे उड्डाणपुलाचे मिळाले आश्वासन, परिसरातील नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:56 IST2021-02-14T00:19:41+5:302021-02-14T00:56:36+5:30
Palghar : उड्डाणपुलासाठी मंजुरी तसेच केळवे रोड पूर्व ते केळगाव रोड बंधारा रस्ता दुरुस्ती आदी महत्त्वपूर्ण समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

केळवे उड्डाणपुलाचे मिळाले आश्वासन, परिसरातील नागरिकांना दिलासा
पालघर : केळवे परिसर कृती समितीसह स्थानिक नागरिकांनी उभारलेल्या आंदोलनाची दखल घेतल्याने केळवे रोड पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल उभारला जाणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उड्डाणपुलासाठी मंजुरी तसेच केळवे रोड पूर्व ते केळगाव रोड बंधारा रस्ता दुरुस्ती आदी महत्त्वपूर्ण समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या परिसरात पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे पुलाखाली परंपरागत मार्ग डीएफसीसीआयएन तसेच उपनगरीय चौपदरीकरणाच्या प्रस्तावित कामासाठी कायमचा बंद करण्यात येणार असल्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटून पाच ते सहा हजार आदिवासी मागासवर्गीय नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार होते. समर्पित मालवाहतूक प्रकल्पांतर्गत येथे काम सुरू असल्याने रेल्वे प्रकल्प अधिकारी, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, खासदार, स्थानिक प्रशासन व पुनर्वसन विभाग आदींनी या ठिकाणी भेट देऊन हा पूल उभारण्यात येईल, असे आश्वासन कृती समितीला दिले. त्या अनुषंगाने पुलाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कृती समितीचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी यांनी पुलाच्या जागेसाठी व पुढील आराखड्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक पाहणी केली. या पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून, निधीचा प्रस्ताव व मार्चच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली.