संमेलननगरीत ठिकठिकाणी लगीनघाई
By Admin | Updated: February 19, 2016 02:28 IST2016-02-19T02:28:09+5:302016-02-19T02:28:09+5:30
अखिल भारतीय नाट्यसंमेलनासाठी श्रीस्थानक असलेली ठाणेनगरी सजवण्याच्या तयारीला वेग आला आहे. शुक्रवारी दुपारी नाट्यदिंडी, सायंकाळी

संमेलननगरीत ठिकठिकाणी लगीनघाई
प्रज्ञा म्हात्रे/पंकज रोडेकर , ठाणे
अखिल भारतीय नाट्यसंमेलनासाठी श्रीस्थानक असलेली ठाणेनगरी सजवण्याच्या तयारीला वेग आला आहे. शुक्रवारी दुपारी नाट्यदिंडी, सायंकाळी उद््घाटन सोहळा आणि त्यानंतर तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल असल्याने सध्या आयोजकांची लगीनघाई सुरू आहे.
नाट्यदिंडीच्या मार्गावर रांगोळ्यांसह अन्य तयारी रात्रभर सुरू होती. शिवाय, संमेलनस्थळी आकाशकंदील लावण्याचे कामही रात्री सुरू झाले. दीपोत्सवातून जागर
ठाण्यातील श्री ऊर्जा फाउंडेशन आणि पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी गडकरी रंगायतन येथे दीपोत्सव साजरा करून नाट्यसंमेलनाचा जागर केला. ढोकाळी येथील पालिकेच्या शाळा क्र मांक-६१ मधील २५ विद्यार्थ्यांनी दिव्यांची रोषणाई केल्याने रंगायतनचा परिसर उजळून निघाला होता. या वेळी महापौर संजय मोरे, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनीही मुलांसोबत दीपोत्सवात भाग घेतला. गडकरीत रांगोळ्या
नाट्यसंमेलनाचा उत्साह गडकरी रंगायतनमध्ये दिसून येत आहे. तेथे नाट्यसंमेलनाची आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच, रंगायतनच्या खांबांवर रंगकर्मींची स्केचेसही लावण्यात आली आहेत. वारली पेंटिंगने रंगायतन सजवण्यात आले आहे. स्वत्व ग्रुपच्या कलाकारांनी ही कलाकुसर केली आहे. रंगायतनच्या आवारात संमेलनाचा लोगोदेखील लावण्यात आला आहे. एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांसह संमेलनासाठी ३०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा व आपत्कालीन समितीच्या नेतृत्वाखाली हे स्वयंसेवक कार्यरत असणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमचा मंडप, भोजन कक्ष, व्हीआयपी कक्ष, स्टॉल, प्रेक्षागृह आदी ठिकाणी ते तैनात असतील, असे समितीप्रमुख राहुल लोंढे यांनी सांगितले. ज्ञानसाधना महाविद्यालय, जोशी-बेडेकर महाविद्यालय, बांदोडकर महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, गुडविल महाविद्यालय, आर.जे. ठाकूर महाविद्यालय व एन.के.टी. महाविद्यालयातील स्वयंसेवक यात सहभागी आहेत. नाट्यदिंडीच्या वेळीही पोलिसांसोबत ते असतील. सकाळी ६ ते दुपारी २ व दुपारी २ ते संमेलनापर्यंत अशा दोन सत्रांत विद्यार्थ्यांना ही ड्युटी देण्यात
आली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, बेवारस वस्तू व संशयास्पद हालचाली आढळल्यास समितीप्रमुखांशी व पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यात्या महाविद्यालयातून दोन प्रमुखांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना काळ्या रंगाचा पेहराव देण्यात आला आहे.
स्वयंसेवकांना टोपी देण्यात आली असून तीच त्या स्वयंसेवकांची ओळख असेल. तसेच, मासुंदा तलावात जीवरक्षकांच्या दोन बोटी ठेवण्यात येणार आहे. तेथेही १० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.