प्रेयसीला कारची धडक: अश्वजितसह तिघांची जामीनावर सुटका
By जितेंद्र कालेकर | Updated: December 18, 2023 19:38 IST2023-12-18T19:37:10+5:302023-12-18T19:38:06+5:30
तपासात सहकार्य करण्याची अट: ठाणे न्यायालयाचा आदेश

प्रेयसीला कारची धडक: अश्वजितसह तिघांची जामीनावर सुटका
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: प्रेयसीला मारहाण करुन तिला कारची धडक दिल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने अश्वजित अनिलकुमार गायकवाड (३४), रोमिल पाटील (३३) आणि सागर शडगे (२९) या तिष्घांचीही वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने त्याच्या वकीलांनी त्याच्या जामीनाची मागणी केली. त्यानंतर त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित तसेच त्याच्या मित्रांवर मारहाणीसह मोटारकारने धडक दिल्याची कैफियत सोशलमिडियावर अलिकडेच यातील पिडित तरुणीने मांडली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात अश्वजितसह तिघांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अश्वजीतने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ मारहाण केल्यानंतर तिला त्याच्या मोटारीने धडक दिल्याचा आरोप आहे. याच घटनेत तिला गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये १७ डिसेंबर रोजी पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रात्री अश्वजितसह तिघांनाही या प्रकरणात अटक केली. तिघांवरही खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, यातील व्यक्ती तपासावर प्रभाव पाडणारी आहेत.
एफआयआर चुकीच्या पद्धतीने नोंदविला. याच प्रकरणात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली असल्याने आरोपीला तोपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी पिडितेचे वकील अॅड. बाबा शेख, अॅड. दर्शना पवार आणि सरकारी वकील दत्तात्रय गायकवाड यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर घटनेप्रमाणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. गुन्हयाची कलमेही लावली असून ही सर्व कलमे जामीनपात्र असल्याचा दावाही केला. त्यावर तक्रारदार तरुणीवर उपचार सुरु असून गुन्हा निर्जनस्ळी रात्रीच्या वेळी घडला आहे. आरोपींकडून पुरावे मिळवायचे आहेत. अपघाताचा करण्यामागचा हेतू होता अगर कसे? याचाही तपास व्हायचा आहे. आरीपीचे तपासात सहकार्य नाही. आरोपी आणि फिर्यादी यांचे प्रेमसंबंध होते.
तपास प्राथमिक अवस्थेत अवस्थेत असल्याने सखाेल तपासासाठी आरोपींना आणखी पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी सहायक पोलिस निरीक्षक विशाल रमणे यांनी न्यायालयाकडे केली. सर्व बाजू पडताळल्यानंतर सह दिवाणी न्यायाधीश प्रियंका धुमाळ यांनी तिघांनाही १४ दिवस न्यायालयीन कोडठीत ठेवण्याचे आदेश दिले.
सशर्त जामीन मंजूर-
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आरोपींच्या वतीने अॅड. समीर हटले यांनी तिघांनाही जामीन देण्याची मागणी केली. त्यावर प्रत्येकी १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत महिन्याच्या १० आणि २५ तारखेला पोलिस ठाण्यात हजेरी, तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव किंवा धमकी न देणे आणि तपासात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला.